मुंबई : परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत असताना त्यांच्या पालकांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न समाजात फारसा चर्चेत नसला तरी गंभीर स्वरूप धारण करीत आहे. मोठ्या उत्साहाने कर्ज काढून मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवले जाते मात्र शिक्षणानंतर तेथे नोकरी नसल्याने एकीकडे मुलाचे कसे होणार तर दुसरीकडे कर्जाचा डोंगर कसा उतरवायचा यासह अनेक मुद्द्यांवर पालकवर्ग प्रचंड तणावाखाली येत आहे.
युनेस्को इन्स्टिट्यूट फॉर स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार जगभरातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा वाटा सुमारे १३ टक्के आहे. शिक्षण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार जवळपास आठ लाखाहून अधिक भारतीय विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत.मुल अमेरिकेत, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा किंवा युरोपमध्ये शिक्षणासाठी जात असताना पालकांना सुरुवातीला अभिमान वाटतो तथापि कालांतराने एकटेपणा, आर्थिक दडपण, सामाजिक दुरावा आणि सततची चिंता या कारणांनी त्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होताना दिसतो. इंडियन जर्नल ऑफ हेल्थ अँड वेलबीइंग मधील एका संशोधनानुसार, परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ६२ टक्के पालकांनी मध्यम ते गंभीर मानसिक ताण असल्याचे कबूल केले आहे.
करोनापूर्वी अमेरिका, ब्रिटन आदी देशात शिक्षणासाठी गेलेले व या काळात शिक्षण पूर्ण केलेल्यांना नोकरी मिळणे दुरापास्त झाले होते. एकीकडे पालकांनी ५० ते ७० लाख रुपयांचे कर्ज घेतलेले असते. त्यासाठी प्रसंगी घर वा दागिनी गहाण ठेवलेले असतात आणि दुसरीकडे मुलाला शिक्षण पूर्ण होऊनही नोकरी मिळत नाही याच मोठ दडपण पालकांना सहन करावे लागते. प्रामुख्याने ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळणे सध्याच्या काळात प्रचंड अवघड बनले आहे.
दुुसरीकडे अमेरिकेत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या मुलांपुढेही नोकरीचे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. अलीकडच्या कालात अमेरिकेत बहुतेक कंपन्यांमध्ये नोकरीच्या ज्या जाहिराती येतात त्यात केवळ अमेरिक नागरिक असलेल्यांनीच अर्ज करावा असे लिहिलेले असते. एआयमुळे तसेच अन्य कारणांमुळे आयटी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. या सर्वाचा ताण इथे भारतात त्या मुलांच्या पालकांना सहन करावा लागत आहे. त्यातही ज्यांनी मोठे कर्ज काढून मुलांना परदेशात शिकायला पाठवले आहे असे पालक एकाचवेळी नैराश्य व तणावाखाली आलेले पाहायला मिळते.
बरेचवेळा पालक अट्टाहासाने मुलाला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवतात.मात्र त्याला अमेरिकेत पाठवताना त्याला मिळालेले विद्यापीठ व त्याचा दर्जा याचा विचार होताना दिसत नाही. गेल्या काही वर्षात १२ वीनंतर अमेरिकेत मुलांना पुढील शिक्षणासाठी पाठविण्याचा प्रकार वाढताना दिसत आहे. यात मुलांच्या शिक्षणाचा कालावधी तसेच त्यासाठी येणारा वाढता खर्च हे कमी म्हणून रुपयाच्या तुलनेत सातत्याने वाढणारा डॉलर यात पालकांची मोठी ओढातान होताना दिसते. जवळपास कोटभर रुपये खर्च करूनही जेव्हा मुलाला अमेरिकेत वा परदेशात नोकरी मिळत नाही, तेव्हा मध्यमवर्गीय पालकांना नैराश्य येते ते प्रचंड तणावाखाली येतात, असे केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले. नव्वदच्या दशकात जे वैद्यकीय विद्यार्थी परेदशात जात असत, त्यातही केईएममधील विद्यार्थी नव्याने तेथे आलेल्या विद्यार्थ्याला एकत्रितपणे मदत करायचे. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, असेही डॉ सुपे म्हणाले.
त्याचप्रमाणे मुल दूर देशात असताना त्यांच्या दैनंदिन जीवनाची काळजी, सुरक्षेची चिंता आणि सततची आठवण यामुळे पालकांमध्ये एकटेपणा व चिंता वाढते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरोसायन्सेस (निम्हान्स) च्या अभ्यासानुसार, अशा पालकांपैकी सुमारे ४५ टक्के पालकांना मध्यम स्वरूपाचा भावनिक ताण जाणवतो. यातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संवादातील अंतर, टाइम झोनमधील फरक, व्यस्त शैक्षणिक वेळापत्रक आणि सांस्कृतिक दुरावा यामुळे मुलांबरोबरील संवाद कमी होतो. परिणामी पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना व नैराश्य वाढलेले दिसतो.
एकीकडे मुलाचे भविष्य तर दुसरीकडे कर्जच्या ओझ्याखाली दबलेले पालक मानसिक आरोग्याचा विचार तरी कधी व कसा करणार हा एक प्रश्नच असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.परदेशात शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना ‘एम्प्टी नेस्ट सिंड्रोम’ आणि ‘अँक्झायटी डिसऑर्डर’चा धोका अधिक असतो. नियमित संवाद, सपोर्ट ग्रुप्समध्ये सहभाग, तसेच मानसिक आरोग्य सल्लागारांची मदत घेतल्यास ताण कमी होऊ शकतो. तथापि परदेशात शिकूनही मुलाला नोकरी नाही आणि घेतलेले लाखो रुपयांचे कर्ज कसे चुकवायचे याची चिंता बहुतेक पालकांना नैराश्याकडे नेताना दिसते. गंभीरबाब म्हणजे भारताता अजुनही मानसिक आरोग्याला म्हणावे तितके महत्त्व नाही. त्यातच परदेशात शिकणाऱ्या पालकांच्या प्रश्नाकडे लक्ष देणे व त्यांना समजून घेण्यासाठी तशी यंत्रणा आपल्याकडे दिसत नाही.