मुंबई :कूपर रुग्णालयातील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा दावा मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून केला जात असला तरी रुग्णांना सेवा पुरविण्यात रुग्णालयाचा हलगर्जीपणा दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याचे दाखले वारंवार मिळत आहेत. कूपर रुग्णालयाच्या पुरुष वैद्यकीय रुग्णकक्षातील शौचालयात सोमवारी पहाटे ४ वाजता पडून जखमी झालेल्या व्यक्तीवर तब्बल दोन तासांनी म्हणजे ६ वाजता डाॅक्टरांनी उपचार केले. दरम्यान सायंकाळी ७ वाजता या रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

कूपर रुग्णालयात यकृताच्या आजारांवरील उपचारासाठी प्रकाश परब (५२ वर्ष) दाखल झाले होते. त्यांना पुरुष वैद्यकीय रुग्णकक्षात दाखल करण्यात आले होते. ते आजारातून बरे झाले असून त्यांना एक – दोन दिवसांमध्ये रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याचे रुग्णालयाकडून त्यांच्या नातेवाईकांना सांगण्यात आले होते. सोमवारी पहाटे ४ वाजता ते शौचालयातून परत त्यांच्या खाटेकडे असताना घसरून पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यातून रक्तस्राव होऊ लागला. त्यांचे कपडे व चादर रक्ताने माखली होती. पुरुष वैद्यकीय रुग्णकक्षातील परिचारिकांनी कर्तव्यावर असलेल्या तिन्ही डाॅक्टरांना तातडीने दूरध्वनीद्वारे याची माहिती दिली.

 परिस्थिती गंभीर असल्याने परिचारिकांनी डॉक्टरांना वारंवार दूरध्वनी करून येण्यास सांगितले. मात्र तिन्हीपैकी कोणीही डॉक्टर रुग्णकक्षात आले नाहीत. तब्बल दोन तासानंतर डॉक्टरांनी येऊन परब यांच्यावर उपचार केले तोपर्यंत त्यांच्या शरीरातून रक्तस्राव होत होता. त्यानंतर सोमवारी सायंकाळी ७ वाजता परब यांचा मृत्यू झाला. उपचारातून बरा झाल्याने काही दिवसांतच घरी सोडण्यात येणाऱ्या रुग्णाचा या घटनेमुळे मृत्यू झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याने मृत्यूचे खरे कारण लवकरच स्पष्ट होईल.

प्रकाश परब हे एमआयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना वैद्यकीय रुग्णकक्षात स्थलांतरित करण्यात आले होते. रुग्ण जखमी झाल्यानंतर कर्तव्यावर असलेले न्यूरोसर्जन, निवासी डॉक्टर यांनी त्यांच्यावर उपचार करून त्यांच्या जखमेवर टाके घातले होते, अशी माहिती कूपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देव शेट्टी यांनी दिली.