मुंबई: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड)ने या प्रकरणाचा तपास स्वतंत्र विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करण्याची मागणी केली आहे. या घटनेने वैद्यकीय सेवकांच्या कार्यस्थळावरील सुरक्षा, प्रशासकीय जबाबदारी आणि डॉक्टरांच्या सन्मानाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मार्डने आपल्या निवेदनात या प्रकरणाची चौकशी निवृत्त उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत न्यायालयीन देखरेखीखाली करण्याची मागणी केली. तसेच ही केस बीड येथील फास्ट ट्रॅक न्यायालयात विशेष सरकारी वकिलाच्या उपस्थितीत चालवावी, संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ६३, ६४(२), ७४, ७५ आणि १०८ अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय डॉक्टरांच्या कार्यस्थळी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी आणि स्वतंत्र वैद्यकीय तक्रार निवारण प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मार्डकडून राज्यभर शांततेच्या मार्गाने आंदोलनाची घोषणा केली असून २९ ऑक्टोबरपासून डॉक्टर काळ्या फिती लावून निदर्शने करणार आहेत. ३० ऑक्टोबरला रुग्णालयांमध्ये जागरूकता बॅनर लावले जातील, तर ३१ ऑक्टोबरला डिजिटल आर्ट आणि रंगोळी मोहिम राबवली जाईल. १ व २ नोव्हेंबरला समाज माध्यमावर #JusticeForDoctors आणि #JusticeForPhaltanMO या हॅशटॅगसह ऑनलाइन अभियान होईल, तसेच गेटवे ऑफ इंडिया येथे मेणबत्ती मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे. ३ नोव्हेंबरपासून तातडीच्या सेवांशिवाय इतर सेवा स्थगित राहतील, तर ४ नोव्हेंबरपासून मुंबईत मोठी रॅली काढण्यात येईल, असे मार्डकडून जाहीर करण्यात आले आहे.