मुंबई : महापालिका निवडणूकीच्या तोंडावर कबुतरांचा मुद्दा चांगलाच तापणार असून या मुद्द्यावरून जैन समाजात फूट पडल्याचे निदर्शनास आले आहे. एका बाजूला महापालिका प्रशासनाने मुंबईत चार नवीन ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यास परवानगी दिलेली असताना दादरच्या कबुतरखान्यासाठी मात्र येत्या सोमवारी उपोषण करण्यावर ठाम असल्याचा इशारा जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी दिला आहे.

मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या जैन समाजाने जैन मुनी निलेश चंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आंदोलन करण्याचे ठरवले आहे. आझाद मैदानावर ३ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा निलेश चंद्र विजय यांनी आधीच दिला होता. त्यातच गेल्या आठवड्यात कबुतरखान्यांच्या विषयावरून पालिका वर्तुळात मोठ्या घडामोडी घडल्या. गेल्या आठवड्यात जैन समाजाच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. मुंबईकरांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यासाठी पर्यायी जागेचा शोध घेऊन त्या उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने लगेचच दोन दिवसांत मुंबईतील चार जागांची निवड करून त्या ठिकाणी सकाळी ७ ते ९ या वेळेत नियंत्रित पद्धतीने खाद्य देण्याची परवानगी दिली. मात्र आधी बंद केलेले कबुतरखाने बंदच राहतील, असेही स्पष्ट केले आहे.

भाजपच्या राजकारणाचा भाग

पालिका प्रशासनाचा हा निर्णय म्हणजे भाजपच्या राजकारणाचा भाग असल्याचा आरोप निलेश चंद्र विजय यांनी केला आहे. चार ठिकाणी कबुतरखाने सुरू केल्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही. दादरचा कबुतरखाना सुरू करण्यासाठी आमरण उपोषण करणारच, असा इशारा मुनी निलेश यांनी दिला आहे. दादरचा कबुतरखाना बंद झाल्यामुळे जैन समाजात नाराजी आहे. या नाराजीमुळे पालिकेच्या निवडणुकीत जैन समाजाची मते भाजपच्या विरोधात जाऊ नये म्हणून हे शिष्टमंडळ पाठवून चार ठिकाणी नवीन कबुतरखाने सुरू करण्याचे राजकारण केले जात आहे. मात्र त्याला आम्ही बळी पडणार नाही, असा इशारा जैन मुनींनी दिला आहे.

परवानगी एकच दिवसाची

केवळ कबुतरांच्याच रक्षणासाठी नाही, तर एकूणच पशू-पक्ष्यांच्या हक्कासाठी आपण ३ नोव्हेंबरपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती निलेश चंद्र विजय यांनी दिली. मात्र निलेश चंद्र विजय यांना सध्या तरी केवळ एकच दिवस आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या या आंदोलनाला जैन समाज किती प्रतिसाद देतो त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.