मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करून आलेल्या किंवा प्रवासासाठी निघालेल्या प्रवाशांना टर्मिनसवर काही काळ तात्पुरता निवारा असावा यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनसवर (एलटीटी) पॉड हॉटेल (कॅप्सूलच्या आकाराप्रमाणे खोल्या) उभारण्यात येणार होते. परंतु एलटीटीवरील पॉड हॉटेलमध्ये खानपान सेवेची सुविधा उपलब्ध नसल्याने जारी केलेल्या निविदेला प्रतिसादच मिळू शकलेला नाही, अशी मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली. त्यामुळे पॉड हॉटेल उभारणीसाठी फेरनिविदा काढण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टूरिझम (आयआरसीटीसी) आणि पश्चिम रेल्वेने नोव्हेंबर २०२१ मध्ये मुंबई सेन्ट्रल टर्मिनसवर पहिले पॉड हॉटेल सुरू केले. यामध्ये ४८ खोल्या असून यात क्लासिक पॉड, महिलां, दिव्यांग प्रवासी आणि कुटुबांतील चार सदस्यांसाठी एक अशी पॉड व्यवस्था आहे. यापाठोपाठ नुकतीच सीएसएमटी टर्मिनसवरही पॉड हॉटेल उभारण्यात आले आहे. सीएसएमटीमधील फलाट क्रमांक १४ जवळील पार्सल कार्यालयानजिक पॉड हॉटेल सुरू करण्यात आले असून यामध्ये किमान ४० वातानुकूलित खोल्या आहेत. याबरोबरच एलटीटीमध्येही पॉड हॉटेल उभारण्यात येणार आहे. यासाठी दोन वेळा निविदा काढण्यात आली होती. पहिल्यांदा पाच वर्षांसाठी, दुसऱ्यांदा १० वर्षांसाठी निविदा काढण्यात आली होती. मात्र या निविदेला प्रतिसादच मिळाला नाही. या पॉड हॉटेलमध्ये खानपानाची सुविधाही उपलब्ध करण्याची मागणी निविदाकारांनी केली होती. मात्र ती नाकारण्यात आली. त्यामुळे निविदाकारांनी यातून काढता पाय घेतला. याबाबत विचारविनिमय करून मध्य रेल्वेने अखेर पॉड हॉटेलमध्ये खानपान सेवेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच एलटीटी येथे पॉड हॉटेल उभारण्यासाठी नवीन निविदा काढण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

सध्या मुंबई सेन्ट्रल येथील पॉड हॉटेलमध्ये १२ तासांसाठी ९९९ रुपये, तर सीएसएमटी येथील पाॅड हाॅटेलसाठी १२ तासांसाठी ५०० रुपये आकारणी करण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pod hotel work at lokmanya tilak terminus stopped mumbai print news amy