मुंबई : रेल्वेत चढताना तोल जाऊन पडल्याने एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ही दुर्घटना घडली. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसाचे नाव दिलीप अहिवळे (५१) आहे. पोलीस हवालदार दिलीप अहिवळे (५१) सोमवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसवर आले होते.
संध्याकाळी ५.१५ च्या सुमारास ते फलाट क्रमांक १० वरून इंद्रायणी एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यात चढत होते. मात्र गर्दी असल्याने त्यांचा तोल गेला. ते फलाट आणि रेल्वे रूळाच्या मध्ये अडकून जखमी झाले. त्यांना तात्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर बनल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री ८ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती सीएसएमटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली. या अपघाताप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिलीप अहिवळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील होते. ते दादासाहेब भडकमकर मार्ग (डीबी) पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते.