मुंबई : आरे येथील रस्त्याच्या कडेला सापडलेल्या ७० वर्षीय वृध्द महिलेच्या नातवाचा शोध लागला असून ती कांदिवलीच्या हुनमान नगर येथे नातवासह रहात होती. ती रस्त्यावर कशी आली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मी आजीला रस्त्यावर टाकले नाही, तर ती स्वत:हून घर सोडून गेली होती, असा दावा तिचा नातू सागर शेवाळेने केला आहे. आरे पोलीस नातवाच्या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी कांदिवली ते आरे मार्गावरील सर्व सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाची तपासणी करीत आहेत.
गोरेगाव येथील आरे परिसरातील युनिट ३२ च्या रस्त्यावरील कचऱ्यात शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास एक वृध्द महिला विव्हळत पडल्याची माहिती आरे पोलिसांना मिळाली होती. तिच्या शरीरावर असंख्य जखमा होत्या आणि तिला त्वचेचा दुर्धर आजार झाला होता. या महिलेने आपले नाव यशोदा गायकवाड असल्याचे सांगितले. माझ नातू मला इथे सकाळी टाकून निघून गेला, असे तिने सांगितले. या वृध्द महिलेला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या महिलेच्या छायाचित्रांच्या आधारे तिच्या कुटुंबियांचा शोध घेतला. ती कांदिवलीतील हनुमान नगर येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिचा नातू सागर शेवाळे याच्याकडे चौकशी केली. आपण आजीला रस्त्यात टाकले नसून ती स्वत:हून घरातून निघून गेल्याचा दावा त्याने केला. माझी आजी या परिसरात एकटी रहात होती. मागील काही महिन्यांपासून आम्ही तिला सांभाळ करण्यासाठी घरी आणले होते, असे तो म्हणाला. शनिवारी सकाळी माझी पत्नी आणि मी कामाला गेलो होतो, तर मुले शाळेत गेली होती. त्यावेळी आजी स्वत:हून घर सोडून गेली असावी, असे शेवाळे याने सांगितले.
पोलिसांकडून दाव्याची तपासणी सुरू
कांदिवली – गोरेगाव दरम्यानचे अंतर खूप आहे. त्यामुळे आजाराने जर्जर झालेल्या यशोदा गायकवाड एकट्या तिथे जाणे शक्य नाही, असे पोलिसांचे मत आहे. आजींची अवस्था अत्यंत नाजूक होती. त्यांना धड चालता येत नव्हते. त्यामुळे ती स्वत: चालत गेली हा सागर शेवाळेने केलेला दावा आम्ही तपासत आहोत, असे आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले. सध्या आरे पोलिसांचे एक पथक त्या संपूर्ण परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाची तपासणी करीत आहेत.
सध्या यशोदा गायकवाड यांच्यावर मुंबईच्या विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची दखल राज्याच्या मानवाधिकार आयोगानेही घेतली असून यासंदर्भात पोलीस आणि प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक सामाजिक संस्थानी या वृध्देची देखभाल आणि उपचार करण्याची तयारी दर्शवली आहे.