लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य विधिमंडळातील विरोधी पक्षाच्या आमदारांनी जनसुरक्षा विधेयकाला तोंडदाखला विरोध करत जनसंघटनांची फसवणूक केली, असा आरोप ‘वंचित’चे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील पुरोगामी, दलित व डाव्या संघटनांच्या बैठकीत केला. या बैठकीत ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्या’विरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘जनसुरक्षा कायद्या’संदर्भात जनसंघटनांची लवकरच कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचेदेखील आंबेडकर यांनी सांगितले.
‘शिक्षक भारती’चे माजी आमदार कपिल पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक बोलावली होती. बैठकीला ३० संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ‘वंचित’चे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, कामगार नेते संजीव पुजारी, राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजा कांदळकर, राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त अतुल देशमुख, डॉ. कैलास गौड, सुजात आंबेडकर, छात्रभारतीचे अध्यक्ष रोहित ढाले यांचा उपस्थितांमध्ये समावेश होता.
दरम्यान, सभागृहाबाहेर जनसुरक्षा विधेयकाला विरोध करायचा आणि सभागृहात विधेयक मंजुरीवेळी मात्र शांत राहायचे हा विरोधकांचा दांभिकपणा असल्याची टीका माजी आमदार कपिल पाटील यांनी केली.
व्यक्ती आाणि संघटनांसाठी धोकादायक आहे. विरोधी पक्षांना या कायद्याची भीती नाही, कारण ते आंदोलन करत नाहीत. त्यांना खरी भीती सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय तपास संस्थेची (सीबीआय) आहे. आणीबाणी लादण्याचा हा नवा प्रकार आहे –अॅड. प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, ‘वंचित’