मुंबई : चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी केलेली वक्तव्ये अनेकदा त्यांना अडचणीत आणतात, मात्र अनेकदा त्यातून निर्माण होणाऱ्या वादविवादात अडकण्यापेक्षा हसत खेळत बाहेर पडण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून केला जातो. अभिनेता प्रसाद ओक यांनीही असाच एक अडचणीचा क्षण कोपरखळी मारत दूर सारला. मध्यंतरी रील्स म्हणजे अभिनय नव्हे, या त्यांच्या वक्तव्यावरून बराच हलकल्लोळ उडाला. मात्र, आगामी ‘रीलस्टार’ नामक चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओक यांनी रील्सवरून घडलेला हा प्रकार म्हणजे ‘रीलस्टार’चे प्रमोशन समजा, असं सांगत चर्चेला विराम देण्याचा प्रयत्न केला.

सिम्मी जोसेफ व रॉबिन वर्गिस दिग्दर्शित ‘रीलस्टार’ या मराठी चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याला लेखक, दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञांनी हजेरी लावली होती. यावेळी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेले अभिनेते प्रसाद ओकही उपस्थित होते. या सोहळ्यात प्रसाद ओक यांचे रील्सवरचे वक्तव्य आणि ‘रीलस्टार’ हा त्यांचा चित्रपट या दोन्हीच्या निमित्ताने पुन्हा एकदा हा विषय निघाला.

‘रील्स म्हणजे अभिनय नाही, हा खूप मोठा भ्रम आहे’ असे वक्तव्य त्यांनी केले होते. ज्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल झाली. त्यानंतर प्रसाद ओक यांच्यावर काही रील्स कलाकारांनी टीका करीत वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले, तर मनोरंजनसृष्टीतील काही कलाकारांनी सदर वक्तव्याचे समर्थनही केले. या पार्श्वभूमीवर ‘मध्यंतरी रील्सच्या वक्तव्यासंदर्भातील माझे अनेक व्हिडिओज व्हायरल झाले होते, या गोष्टीला तुम्ही ‘रीलस्टार’ चित्रपटासाठी केलेले प्रमोशन समजा’, असे प्रसाद ओक यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

‘मला ‘रीलस्टार’ चित्रपटाच्या निमित्ताने वेगळ्या साहसी दृश्यांचा अनुभव घेता आला. दिग्दर्शक सिम्मी व रॉबिन अनोख्या पद्धतीने प्रसंग समजावून सांगायचे, त्यामुळे दोघांकडून भाषेची अडचण जाणवली नाही. केरळमधील लोकांनी एकत्र येऊन मराठी चित्रपटसृष्टीत काम करणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. हा मराठी व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा अनोखा संगम आहे’, असे या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेते प्रसाद ओक यांनी सांगितले. या चित्रपटात प्रसाद ओक यांच्याबरोबर भूषण मंजुळे, मिलिंद शिंदे, कैलास वाघमारे, उर्मिला जगताप, रुचिरा जाधव, स्वप्नील राजशेखर, शुभांगी लाटकर, विजय पाटकर, अनंत महादेवन अशा नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत.

हा चित्रपट सुधीर कुलकुर्णी यांनी लिहिला आहे. रंगभूषा भागवत सोनावणे यांनी, तर राणी वानखडे यांनी वेशभूषा केली आहे. प्रॉडक्शन डिझाईन राहुल शर्मा आणि समीर चिटणवीस यांनी केले आहे. या चित्रपटाचे क्रिएटिव्ह निर्माते महेंद्र पाटील आहेत आणि मुख्य सहयोगी दिग्दर्शक नंदू आचरेकर आहेत. दीपक पांडे हे कास्टिंग डायरेक्टर आणि रोहित कुलकर्णी असोसिएट डायरेक्टर आहेत.