भाजपाने राहुल गांधींचा उल्लेख रावण असा केल्याने काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. दरम्यान, काँग्रेसने मुंबईत आज भाजपाविरोधात आंदोलनही पुकारले आहे. या आंदोलनात मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासह शेकडे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. तसंच, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही याप्रकरणी आवाज उठवला असून भाजपाला लक्ष्य केलं आहे. आतापर्यंत देशात महिलांवर झालेल्या अत्याचाराच पाढाच त्यांनी वाचून दाखवला आहे.
विजय वडेट्टीवार एक्सवर म्हणाले की, “भाजपच्या हीन पातळीवरील राजकारणाचा निषेध. ९ वर्षात भाजप ने देशात रावणसारखी सत्ता चालवली. ज्याप्रमाणे रावणाने बहरुपी बनून सीता मातेचे अपहरण केले होते आणि त्यांना त्रास दिला, त्याचप्रमाणे भाजपने सुद्धा विकासाचे सोंग घेऊन बहरूपी बनून देशाचं वाटोळं केलं आहे.”
“९ वर्षात भाजपने देशात रावणराज निर्माण केले. महिला कुस्तीपटूचे लैंगिक शोषण करणाऱ्या भाजपच्या खासदाराला पाठीशी घातले. भाजप सत्तेत असलेल्या मणिपूर मध्ये तेथील आया बहिणींची धिंड काढली जाते पण तिकडे दुर्लक्ष केले जाते. कोणताही भाजप नेता याबाबत बोलत नाही. बिल्कीस बानोवर बलात्कार करणाऱ्यांची शिक्षा माफ करून त्यांचा सत्कार केला जातो. हे रावणराज नाही तर काय आहे?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“रावणराज करणाऱ्या भाजपाला स्वतःची लंका जळत असल्याची चाहूल लागली आहे. त्यामुळेच सत्ताधारी भाजपने आमचे नेते राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी हिन पातळीवरील राजकारण सुरू केले आहे. राजकारणात भाजपने सभ्यतेची पातळी ओलांडली”, असंही ते म्हणाले.
प्रणिती शिंदे यांनीही व्यक्त केला संताप
“मोदींचा आत्मविश्वास कमी होताना दिसतोय. रावणाची काही ठिकाणी पूजा करतात. पण कुंभकर्णाचं काय? जो झोपेचं सोंग घेतो. मोदी सध्या तेच करत आहेत. ज्वलंत मुद्द्यांवर मोदी बोलत नाही, मौन घेतात. मोदी फक्त हरामाचं खात आहेत, लोकांच्या नावावर खात आहेत. जे ज्वलंत विषय आहेत, त्यावर बोलत नाहीत. त्यामुळे आता लोकांना कळून चुकलंय की खरा रावण कोण आहे”, अशा कठोर शब्दांत प्रणिती शिंदे यांनी टीका केली असून राहुल गांधींना रावणाचं रुप दिल्याने निषेध व्यक्त केला आहे.