मुंबई : आपल्या देशाच्या संविधानाने आपल्याला विचार, अभिव्यक्ती आणि संस्कृती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. कला हीच या स्वातंत्र्याची सर्वात सुंदर आणि प्रभावी अभिव्यक्ती आहे. जेव्हा विद्यार्थी, कलाकार आपल्या कल्पनांना रंग आणि रेषांतून आकार देतात, तेव्हा ते केवळ चित्र निर्माण करत नसून, भारताच्या उज्ज्वल भविष्यातील रेषा आखत असतात, भविष्यचित्र रंगवत असतात, अशा शब्दात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विद्यार्थी, कलाकारांना मार्गदर्शन केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यापैकी सेवापर्व उपक्रमांतर्गत राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, महानगरपालिका आणि सर ज. जी. कला महाविद्यालय यांच्यातर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे मंगळवारी एकदिवसीय चित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थ्यांना, कलाकारांना मार्गदर्शन करताना नार्वेकर बोलत होते. आतापर्यंत लोकांना कलेपर्यंत यावे लागत होते. पण आता कला लोकांपर्यंत येत आहे. कला जोपासण्यासाठी कल्पनाशक्ती आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला कोणतेही बंधन नसते. विद्यार्थ्यांनी, कलाकारांनी या व्यासपीठाचा फायदा करून घ्यावा आणि आपल्या भावना, कल्पना कागदावर उतरविण्याचा प्रयत्न करावा, असे महापालिका आयुक्त भूषण गगराणी म्हणाले. आजची ही चित्रकला कार्यशाळा आपल्या युवकांना नव भारताची कल्पना करण्याची संधी देत आहे, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नमूद केले.

विद्यार्थी कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालक निधी चौधरी, पोलिस उप आयुक्त डॉ. प्रवीण मुंढे, महानगरपालिका उप आयुक्त चंदा जाधव, उप आयुक्त डॉ. प्राची जांभेकर, पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, राज्य कला संचालनालयाचे संचालक किशोर इंगळे, सर ज. जी. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य राजीव मिश्रा, पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, कलाकार, शिल्पकार सहभागी झाले होते. या कार्यशाळेत महानगरपालिकेच्या शाळांतील ७५० विद्यार्थी, सर ज. जी. कला महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.