मुंबई : राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची निवड प्रक्रिया सुरू झाली असून, कुलगुरू निवड समितीच्या समन्वय अधिकारीपदी कोईम्बतूरच्या भरतियार विद्यापीठाच्या गणित विभागातील प्राध्यापक डॉ. एस. सर्वानन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याबाहेरील प्राध्यापकाची समन्वय अधिकारीपदी निवड का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. परभणी विद्यापीठानंतर राहुरीमध्येही राज्याबाहेरील कुलगुरुंची निवड केली जाण्याची शंका व्यक्त केली जात आहे.

कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या निधनामुळे राहुरी विद्यापीठाचे कुलगुरूपद सहा महिन्यांपासून रिक्त आहे. या पदाची निवड प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठीच्या शोध आणि निवड समितीचे समन्वयक अधिकारी म्हणून कोईम्बतूरच्या भरतियार विद्यापीठाच्या गणित विभागातील प्राध्यापक डॉ. एस. सर्वानन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवड समितीवर बाहेरच्या राज्यातील प्राध्यापक किंवा तज्ज्ञांची निवड केली जाते. पण समन्वय अधिकारीपदी तमिळनाडूतील प्राध्यापकांची का निवड करण्यात आली याबाबत वेगळीच चर्चा आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे सुद्धा कोईम्बतूरचे. हा योगायोग की अन्य काही, अशी शंका घेतली जाते.

अशी असते निवड प्रक्रिया

कुलपती म्हणून कुलगुरूंची निवड प्रक्रिया राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली चालते. त्यासाठी शोध आणि निवड समितीचे अध्यक्ष आणि समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती राज्यपाल करतात. कृषि विद्यापीठांच्या कुलगुरूच्या निवडीसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक किंवा त्यांचा प्रतिनिधी, कृषी विभागाचे सचिव आदींचा समावेश असलेली समिती छाननीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतात, मुलाखतीनंतर ही समिती पाच नावांची शिफारस राज्यपालांना करतात, या पाच नावांतून एकाची कुलगुरू पदी निवड करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. या निवड प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन परिषदेला कोणताही अधिकार नाही.

परभणीत उत्तर प्रदेशचे कुलगुरू

परभणी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून उत्तर प्रदेशातील डॉ. इंद्रा मणी यांची निवड झाली आहे. आता राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरही राज्याबाहेरील तज्ज्ञाची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविली जाते.

कुलगुरू मराठी व्यक्तीच असावी

राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू शोध आणि निवड समितीचे समन्वयक अधिकारी म्हणून राज्यातील व्यक्तीची नियुक्ती होणे गरजेचे होते. राज्यात अनेक व्यक्ती असतानाही राज्याबाहेरील व्यक्तीची का नियुक्ती केली, असा प्रश्न उपस्थित होतो. राज्याबाहेरील कुलगुरूंचा अनुभव फार चांगला नाही. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कृषी समस्यांवर संशोधन होण्यासाठी कुलगुरू पदावर पात्र मराठी व्यक्ती बसण्याची गरज आहे, असे मत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सी. डी. मायी यांनी व्यक्त केले.