मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज(शनिवार) मुंबईतील चांदिवली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यलायचे उद्धाटन झाले. यानंतर बोलताना राज ठाकरे यांनी मनसे शिवजयंती तिथीने साजरा करणारा पक्ष आहे, असे सांगितले आणि आपण शिवजयंती तिथीने साजरी का करावी यामागचे कारणही त्यांनी यावेळी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे म्हणाले, “मी भाषणाला उभा नाही. मी व्यासपीठावर येण्याचं एकमेव कारण तुमचं सर्वांचं दर्शन व्हावं आणि त्यासाठी मी व्यासपीठावर आलोय, मी काही हारतुरे घ्यायला आलेलो नाही. आज शिवजयंती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा शिवजंयती आपण तिथीने साजरी करतो, याचा अर्थ आज साजरी करायची असा नव्हे.”

तसेच, “आमच्या छत्रपतींचा जयजयकार, आमच्या छत्रपतींची जयंती मला असं वाटतं ३६५ दिवस आपण साजरी करावी. पण आजही साजरी केली तरी काही हरकत नाही आणि तिथीनेही साजरी केली तरी काही हरकत नाही. पण तिथीने का? आणि याचं एकमेव कारण, आपल्याकडे जेवेढे सण येतात दिवाळी, गणेशोत्सव इत्यादी जेवढे काही सण येतात ते सर्व सण आपण तिथीने साजरे करतो. आपण तारखेने साजरे नाही करत. मागील वर्षी दिवाळी कोणत्या तारखेला होती, ती या वर्षी त्याच तारखेला असेल? नसतेच. मागील वर्षी गणेशोत्सव ज्या तारखेला होता तो यंदाही त्याच तारखेला नसेल, कारण ते तिथीने येतात. जन्मदिवस, वाढदिवस हे आपले. महापुरुषांचा आणि तोही छत्रपतींचा जन्मदिवस म्हणजे आपल्यासाठी तो सण आहे आणि म्हणून तो सण आपण तो तिथीने साजरा करायचा. याचा अर्थ आज साजरा करायचा, असा होत नाही. त्यामुळे ज्या दिवशी तिथीने साजरा करायचा त्यावेळी यापेक्षाही जास्त जल्लोषात शिवजयंती साजरी तुमच्याकडून झाली पाहिजे. एवढच सांगण्यासाठी मी आज इथे आलोय.” असं राज ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवलं.

याचबरोबर “लोकांना विश्वास वाटला पाहिजे की या शाखेत आल्यानंतर मला न्याय मिळेल. ही शाखा आहे दुकान नव्हे. त्यामुळे त्याचं पावित्र्य तुम्ही राखलं पाहिजे. एवढी फक्त मी तुम्हाला विनंती करतो. आजच्या शिवजयंतीच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो, धन्यवाद.” असं राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना उद्देशून यावेळी म्हटलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray inaugurates mns office in chandivali best wishes for shiv jayanti msr