मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात ८ जून रोजी आढळून आलेल्या बिबट्याच्या बछड्याची त्याच्या आईशी पुनर्भेट अखेर अयशस्वी ठरली आहे. तब्बल २५ दिवसांच्या प्रयत्नांनंतर वनविभागाने या बछड्याला मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे सुपूर्द केले.
लांजा तालुक्यातील पुनस गावातील रस्त्यावरती ८ जून रोजी बिबट्याचे पिल्लू असल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली होती. त्यानंतर घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाल्यानंतर परिसराची पाहणी केली असता त्या ठिकाणी बिबट्याचे एक महिन्याचे नर पिल्लू आढळून आले. पिल्लू अशक्त दिसत असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले.
विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनानुसार मादी बिबट्याबरोबर पुनर्भेट करण्याकरिता बिबट्याच्या पिल्लाला ९ जून रोजी पिल्लाला ताब्यात घेतलेल्या परिसरात ठेवण्यात आले. मात्र, आई आणि पिल्लाची भेट झाली नाही.
त्यानंतर सातारा वनविभाग व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी पिल्लाची प्राथमिक तपासणी केली आणि पुन्हा १० जून रोजी डॉ. बनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्भेट करण्याकरिता जागा निवडण्यात आली व बिबट्याचे पिल्लू कॅमेराच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. परंतु पुन्हा पुनर्भेट झाली नाही. मात्र, मादी बिबट पिल्लाच्या जवळ येऊन गेल्याचे छायाचित्र कॅमेऱ्यामध्ये टिपले गेले होते.
दरम्यान, या कालावधीत रत्नागिरी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने पुनर्भेट करणे कठीण जात होते. मात्र, या परिस्थितीही वनविभागाचे प्रयत्न सुरु होते. वनविभागाने थर्मल ड्रोनद्वारे दिवसा व रात्री पिल्लू सापडलेल्या जागेची तपासणी केली. मात्र त्या परिसरात कुठेही मादी बिबट आढळून आले नाही. एकीकडे वनविभाग पिल्लाची देखरेख करताना त्याला कोणताही प्रकराचा संसर्ग होऊ नये याची काळजी देखील घेत होते.
दरम्यान, बिबट्याचे पिल्लू ८ जून ते २ जुलैपर्यंत म्हणजेच २५ दिवस वनविभागाच्या ताब्यात होते. तब्बल २५ दिवसांनी बिबट्याच्या पिल्लाला बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
राष्ट्रीय उद्यानाकडून सुरुवातीला नकार
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून सुरुवातीला पिल्लू घेण्यास नकार देण्यात आला होता . उद्यानात जागा झाल्यावर कळविण्यात येईल असे सांगण्यात आले. यामध्ये १० ते १५ दिवस झाले. इतके दिवस पिल्लाला सांभाळणे जोखमीचे होते. पिल्लाला २५ दिवस सांभाळणे ही मोठी जबाबदारी होती आणि ती जबाबदारी रत्नागिरी वनविभागाने पार पाडली.
सध्या पिल्लाला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. थोडे अशक्त असल्याने काही दिवस त्याची विशेष काळजी घेतली जाईल. – विनया जंगले, पशुवैद्यक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान