बंडखोर शिवसेना आमदार संदीपान भूमरे ‘म्हाडा’चे घर परत करणार

…पण आता आपल्याला हे घर नको असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Sandipan Bhumre new
(संग्रहीत छायाचित्र)

म्हाडाच्या औरंगाबाद मंडळाने घरासाठी काढलेल्या सोडतीत शिवसेनेचे पैठण मतदारसंघातील बंडखोर आमदार आणि रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे विजेते ठरले आहेत. मात्र त्यांनी हे घर परत करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण सहज अर्ज भरला होता, पण आता आपल्याला हे घर नको असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

औरंगाबाद मंडळाने शुक्रवारी ९८४ घरांसाठी आणि २२० भूखंडांसाठी ऑनलाइन सोडत काढण्यात आली. या ९८४ घरांमधील एकूण १० घरे खासदार आणि आमदारांसाठी राखीव होती. यात संकेत क्रमांक १३९ मधील चिखलठाणा, औरंगाबाद येथील २३ लाख २२ हजार रुपये किंमतीच्या उत्पन्न गटातील ८ घरांचा, संकेत क्रमांक १४४, नळदुर्ग, उस्मानाबाद येथील एका आणि संकेत क्रमांक १४४, इटखेडा, औरंगाबाद येथील एका घराचा समावेश होता. संकेत क्रमांक १४४ आणि १४३ मधील प्रत्येकी एका घरासाठी एकही अर्ज न आला नाही. परिणामी या घरांची सोडत काढता आली नाही. त्याचवेळी संकेत क्रमांक १३९ मधील आठ घरांसाठी केवळ एकच अर्ज सादर झाला होता आणि हा अर्ज भुमरे यांचा होता. ८ घरांसाठी एकच अर्ज आल्याने साहजिकच भुमरे सोडतीत विजेते ठरले आहेत. भुमरे सध्या शिंदे गटातील आमदारांसोबत गोवाहाटी येथे असून म्हाडाच्या घरासाठी विजेत्या ठरलेल्या भुमरे यांच्याबद्दल समाज माध्यमावर जोरदार चर्चा रंगली आहे.

अल्प उत्पन्न गटातील घरासाठी भुमरे विजेते ठरले आहेत –

आपल्याला हे घर नको आहे. आपण सहज अर्ज भरला होता. आपण घर घेणार नाही असे भुमरे यांनी या संदर्भात ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. भुमरे यांनी हे घर घेणार नसल्याचे सांगितल्याने आता हे घर त्यांना परत करावे लागेल. अन्यथा त्यांनी कागदपत्रे सादर केली नाही तर आपोआपच घर रद्द होईल. महत्त्वाचे म्हणजे भुमरे यांनी कागदपत्रे सादर केली तरी त्यांच्या पात्रतेबाबत अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. औरंगाबादची ही सोडत जुन्या उत्पन्न मर्यादेनुसार निघाली होती. अल्प उत्पन्न गटातील घरासाठी भुमरे विजेते ठरले आहेत. या घरासाठी मासिक उत्पन्न २५,००१ रुपये ते ५०,००० रुपये असणे बंधनकारक होते. आमदारांचे वेतन लक्षात घेता ते अल्प उत्पन्न गटात पात्र ठरण्याची शक्यता नाही. त्यामुळे भुमरे यांनी हे घर स्वीकारले असते तर पात्रतेचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खासदार, आमदारांची १० ही घरे रिकामी –

“औरंगाबादच्या ९८४ घरांच्या सोडतीतील १० घरे खासदार, आमदारांसाठी राखीव होती. यातील एकाच घरासाठी भुमरे यांचा अर्ज आला होता. त्यांनी घर परत करण्याचा निर्णय घेतल्याने आता १० घरे रिकामी राहणार आहेत. आता ही १० घरे नियमानुसार पुढील सोडतीत सर्वसामान्यांसाठी वर्ग केली जातील. या पुढे ही घरे रिकामी राहणार नाहीत.”, अशी माहिती औरंगाबादचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rebel shiv sena mla sandipan bhumare will return to mhadas house mumbai print news msr

Next Story
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना दोन वेळा फोन; ‘या’ विषयांवर झाली चर्चा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी