मुंबई : सप्टेंबरमध्ये पावसाचा मुक्काम कायम राहिल्याने कीटकजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये असलेला हिवताप व डेंग्यूचा ताप सप्टेंबरमध्येही कायम आहे. सप्टेंबरमध्ये हिवतापाच्या १ हजार ४११, तर डेंग्यूच्या १ हजार ३८४ रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईमध्ये पावसाच्या अनिश्चित स्वरुपामुळे साथीच्या आजारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कीटकजन्य आजारांची रुग्णसंख्या ऑगस्टमध्ये उच्चांकावर असताना यंदा सप्टेंबरमध्ये हिवताप व डेंग्यूचा ताप कायम राहिला आहे. ऑगस्टमध्ये हिवतापाचे १ हजार ५५३, तर सप्टेंबरमध्ये १ हजार ४११ रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे ऑगस्टमध्ये डेंग्यूचे १ हजार १५९, तर सप्टेंबरमध्ये १ हजार ३८४ रुग्ण सापडले आहेत. चिकनगुनियाचे ऑगस्टमध्ये २२०, तर सप्टेंबरमध्ये १३९ रुग्णांची नोंद झाली. लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव मुंबईमध्ये काही प्रमाणात कमी झाला आहे. लेप्टोचे ऑगस्टमध्ये २२७, तर सप्टेंबरमध्ये १४३ रुग्णांची नोंद झाली आहे. अतिसाराच्या रुग्णांची संख्या ऑगस्टच्या तुलनेत कायम असल्याचे दिसून येते. ऑगस्टमध्ये अतिसाराचे ५९२ रुग्ण सापडले होते, तर सप्टेंबरमध्ये ४४२ रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये हिवताप आणि चिकनगुनिया या आजारांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसत असले तरीही २०२४ मधील आजारांशी तुलना करता ही संख्या कमी आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या कालावधीमध्ये आरोग्य विभागाकडून सर्व प्रभागामध्ये विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात आल्याने या आजारांना काही प्रमाणात प्रतिबंध करणे शक्य झाल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कीटकजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ४९ लाख ५१ हजार ९०२ नागरिकांची तपासणी केली. यापैकी १ लाख ८५ हजार ८६३ नागरिकांचे रक्ताचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आले. हिवताप नियंत्रणासाठी ५७ हजार ५१८ प्रजनन स्त्रोतांची तपासणी करण्यात आली. तसेच ५८ हजार ५८९ नागरिकांवर लेप्टो प्रतिबंधात्मक उपचार करण्यात आले. त्याचबरोबर ४२ हजार ३३३ इमारती व ६ लाख ६८ हजार ५८८ झोपड्यांमध्ये धूरफवारणी केल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली.

चार महिन्यांतील आकडेवारी

आजार – जून – जुलै – ऑगस्ट – सप्टेंबर

हिवताप – ८८४ – १,२९४ – १५५३ – १४११

डेंग्यू – १०५ – ७०८ – ११५९ – १३८४

चिकुनगुनिया – २१ – १२९ – २२० – १३९