मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदरच असून त्यांच्या वक्तव्याला कोणतेही प्रत्युत्तर देणार नाही. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यावर किंवा नंतरही विजयोत्सव साजरा करणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकारांना सांगितले.
शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असे वक्तव्य ठाकरे यांनी केले होते. त्याबाबत केसरकर म्हणाले, याबाबत एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील. उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. नाती जपण्यात जी गोडी आहे ती राजकारणात नाही.
ठाकरे सरकार कोसळल्यावर शिंदे गटाच्या आमदारांनी गोव्यात आनंदोत्सव केला व काही आमदार टेबलवर चढून नाचले होते. त्यावर जनतेमध्ये व समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर शिंदे यांनी या आमदारांना याबाबत सूचना केल्याने यापुढे विजयोत्सव न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.