Rohit Arya Powai Studio Incident: मुंबईतील पवई येथे एका फिल्म स्टुडिओमध्ये आज दुपारी रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने १७ मुले आणि एका ज्येष्ठ नागरिकासह १९ जणांना ओलीस ठेवले होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अवघ्या ३५ मिनिटांच्या कारवाईत पीडितांची सुटका केली. मात्र, या कारवाईत आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाला आहे.

चित्रपटाच्या ऑडिशनदरम्यान आरए स्टुडिओमध्ये पीडितांना आपल्या विविध मागण्यांसाठी कोंडून ठेवणाऱ्या रोहित आर्यला वाटाघाटीदरम्यान पोलिसांची गोळी लागली. त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी बचावकार्य सुरू करण्यापूर्वी आरोपी रोहित आर्यशी जवळजवळ दोन तास वाटाघाटी करत होते. त्या वाटाघाटीदरम्यान पोलिसांनी आर्यला इशारा दिला होता की, जर त्याने मुलांना सोडले तर ते त्याच्या मागण्या पूर्ण करतील. उलट आर्य पोलिसांना धमक्या देत होता की, जर त्याच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तो मुलांना जिवंत जाळून टाकेल.

जेव्हा अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की आरोपी कोणत्याही परिस्थितीत ओलीसांना सोडण्यास तयार नाही, तेव्हा त्यांनी मुलांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन राबवण्याचा निर्णय घेतला.

यानंतर पोलिसांनी अवघ्या ३५ मिनिटांत ओलीसांची सुटका केली. यासाठी आठ कमांडोंची क्विक रिअ‍ॅक्शन टीम एका बाथरूममधून स्टुडिओच्या ऑडिशन रूममध्ये गेली.

रक्तपात टाळण्यासाठी आणि या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून मुख्य कमांडरने वाटाघाटीद्वारे परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपी रोहित आर्य या क्विक रिअ‍ॅक्शन टीमला धमकी देऊ लागला की, जर आत आला तर ऑडिशन रूम पेटवून देईन. याच रूममध्ये सर्व पीडित होते.

जेव्हा वाटाघाटी फिस्कटल्या, तेव्हा आरोपीने गोळीबार केला, ज्यामुळे कमांडोंना प्रत्युत्तर द्यावे लागले. मुख्य कमांडोने स्वतः आरोपीवर गोळीबार केला. यात आरोपी जखमी झाला.

“आम्ही कोणताही धोका पत्करण्याच्या स्थितीत नव्हतो,” असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आर्याने गोळीबार करताच, प्रत्युत्तर देण्याचा निर्णय क्विक रिअ‍ॅक्शन टीमने घेतला. चकमकीदरम्यान आर्यला गोळी लागली. त्याला ताब्यात घेऊन स्टुडिओमधून बाहेर काढण्यात आले आणि नंतर रुग्णालयात उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी म्हटले की, प्रथमदर्शनी, मुलांना ओलीस ठेवण्यामागे काही प्रलंबित कामामधील थकबाकी कारणीभूत असल्याचे दिसत आहे. दुपारी १.४५ वाजता या घटनेची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर पवई येथे पोलिसांचे पथक पोहोचले आणि त्यांनी मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न केले.