शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. तसेच चीनने भारताच्या ६५ गस्ती चौक्यांवर ताबा मिळवल्याचा आरोप करत त्यावर मोदी का बोलत नाहीत? असा सवाल केला. यावेळी राऊतांनी मणिपूरमधील हिंसाचारावही बोट ठेवलं. ते बुधवारी (२१ जून) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

संजय राऊत म्हणाले, “आपली पाकिस्तानबाबत जी आक्रमक भूमिका असते ती चीनबाबत का नसते? भारताच्या ६५ गस्ती चौक्या जवळजवळ चीनच्या ताब्यात आहेत. असं असताना आपण केवळ इथून एक निवेदन देत आहोत. आपण अखंड हिंदुस्थानची भाषा करत असू तर त्या अंखड हिंदुस्थानात चीनने गिळलेला प्रदेश नाही का?”

“चीनने गिळलेला भागही अखंड हिंदुस्थानात येतो”

“फक्त पाकिस्तानने गिळलेला काश्मीरचा नाही, तर चीनने गिळलेला भागही अखंड हिंदुस्थानात येतो हे लक्षात ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गेले आहेत. त्यांनी हा चीनचा मुद्दा जागतिक मंचावरही मांडला पाहिजे. मात्र, त्याआधी त्यांनी हा मुद्दा भारतातही मांडला पाहिजे. मोदींनी भारताच्या भूमीवरून चीनला कधी इशारा दिला आहे का? मात्र तसं दिसत नाही,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “…तेव्हा एकनाथ शिंदे आत्महत्या करू शकतात”; दीपक केसरकरांच्या गौप्यस्फोटावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

“मणिपूरमध्ये दहशतवाद्यांच्या हातात शस्त्र कोण देत आहे?”

“हे भारत सज्ज आहे असं सांगतात. मात्र, मग ही सज्जता हिंसाचार होत असलेल्या मणिपूरमध्ये का दिसत नाही. मणिपूर हाही चीनला लागून असणारा प्रदेश आहे. तो सीमावर्ती भाग आहे. असं असूनही ही सज्जता मणिपूरमध्ये का नाही. मणिपूर का पेटलं आहे. मणिपूरमध्ये दहशतवाद्यांच्या हातात सीमेपलिकडून शस्त्र कोण देत आहे? यावर मोदींनी वक्तव्य केलं असतं तर देशाला मार्गदर्शन मिळालं असतं,” असंही राऊतांनी नमूद केलं.