आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला मोठा ट्विस्ट मिळाल्याचं आज समोर आलं आहे. या प्रकरणात एनसीबीकडून नेमण्यात आलेले पंच प्रभाकर साईल यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटींची मागणी करण्यात आली असून समीर वानखेडेंनी आमच्याकडून कोऱ्या पंचनाम्यावर सह्या घेतल्याचा आरोप प्रभाकर साईलनं केला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून भाजपाला लक्ष्य केलं जात आहे. सुरुवातीपासूनच भाजपाकडून समीर वानखेडे आणि एनसीबीच्या कारवाईचं समर्थन केलं जात होतं. त्यावर आता महाविकासआघाडीकडून निशाणा साधण्यात आला आहे. शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी यासंदर्भात भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे अर्धा ग्रॅम, पाव ग्रॅम ड्रग्ज पकडतात आणि…

संजय राऊत यांनी एबीपी माझावर प्रतिक्रिया देताना या प्रकरणावरून भाजपावर कठोर शब्दांत टीका केली आहे. “या आरोपांचा तपास महाराष्ट्र पोलिसांनी स्वत:हून दखल घेऊन करावा. मुंबईत असे प्रकार घडवले जात आहेत आणि महाराष्ट्राला बदनाम केलं जात आहे. मुंबईचे पोलीस देखील अंमली पदार्थ पकडत आहेत. पण हे दोन ग्रॅम, अर्धा ग्रॅम, पाव ग्रॅम पकडतायत आणि महाराष्ट्राला बदनाम करतायत. एनसीबीचे अधिकारी, त्यांचे पंच किवा आत्ता समोर आलेल्या माहितीसंदर्भात तात्काळ कठोर कारवाई व्हायला हवी”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“यांच्या (एनसीबी) प्रत्येक कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पण यांच्यावर कुणी बोललं, तर भाजपाला असा काही पान्हा फुटतो, जणू काही त्यांच्या गर्भातूनच हे लोक जन्माला आले आहेत”, अशा शब्दांत संजय राऊतांनी खोचक टोला लगावला आहे.

“समीर वानखेडेंपासून जीवाला धोका”; आर्यन सोबत सेल्फीत असणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीच्या सहकाऱ्याचा आरोप

“एवढे पुरावे समोर येऊनही तुम्ही कोणत्या तोंडानं बोलताय?”

“नवाब मलिक जे सांगत होते, त्याची चेष्टा भाजपाचे लोक करत होते. आता यात भाजपाचा काय संबंध होता का हे पाहावं लागेल. एवढे पुरावे समोर येऊनही तुम्ही कोणत्या तोंडानं बोलताय? केंद्रीय यंत्रणा मुंबई-महाराष्ट्रात येतात आणि राज्याला बदनाम करायचा प्रयत्न करतायत. यात एनसीबीची भर पडली आहे”, असं संजय राऊत म्हणाले. कारवाई करण्यासाठी सगळ्यांनाच पुढाकार घ्यावा लागेल. महाविकासआघाडी सरकार म्हणून यात कारवाई करावी लागेल. केंद्रीय तपास यंत्रणांविषयी जे पुरावे समोर येत आहेत, ते धक्कादायक आहे, असं देखील त्यांनी सांगितलं.

समीर वानखेडे एनसीबीत आल्यापासून… – नवाब मलिक

“संपूर्ण यंत्रणा चुकीची आहे असं नाही. समीर वानखेडे ज्या दिवसापासून एनसीबीमध्ये आला, तेव्हापासून त्याने खोट्या केसेस तयार करायला सुरुवात केली. फिल्म इंडस्ट्रीला टार्गेट करून प्रसिद्धी मिळवून घ्यायची. मग त्या माध्यमातून दहशत निर्माण करायची आणि एक मोठं वसूली रॅकेट सुरू झाल्याचं आम्ही आधीपासून सांगत होतो”, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams bjp on prabhakar sail allegation ncb officer sameer wankhede pmw