मुंबई : बोरिवलीमध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यात साडी नेसून चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधींनी आयोजित केलेल्या क्रीडा महोत्सवात साडीथॉन स्पर्धा होणार आहे. पारंपरिक साडी नेसून २ ते ३ किमी चालण्याची ही स्पर्धा आहे.साडी हा भारतीय महिलांचा पारंपरिक पोषाख असला तरी आजकाल नोकरदार महिला आणि करिअर करणाऱ्या महिला साडी क्वचितच नेसतात. साडी नेसून लोकल पकडणे, दिवसभर कार्यालयात वावरणे शक्य नसल्यामुळे साडी हा पोशाष दैनंदिन वापरातून बाद होऊ लागला आहे. साडी नेसून चालणे हे सुद्धा आता नव्या पिढीतील महिलांसाठी कौशल्याचा भाग बनला आहे. मात्र बोरिवलीत साडी नेसून चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
उत्तर मुंबईतील भाजपचे खासदार पियुष गोयल यांनी ‘खासदार क्रीडा महोत्सव २०२५’ चे आयोजन केले आहे. नोव्हेंबर महिन्यात हा महोत्सव होणार आहे. परंपरा आणि फिटनेसचा संगम या उत्सवात साधण्यात आला आहे. उत्तर मुंबईमधील विविध प्रभागांतील महिला पारंपरिक साड्या नेसून साडीथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. भारतीय संस्कृती, स्वदेशी आणि पारंपरिक वेशभूषेचा सन्मान करणे हा या मागचा उद्देश्य असल्याचे गोयल यांनी सांगितले. साडी हे भारतीय संस्कृतीचे पारंपरिक वस्त्र असून साडी नेसून चालण्याच्या या स्पर्धेमुळे जुन्या परंपरेला उजाळा मिळेल, असेही त्यांचे म्हणणे आहे.
वॉकथॉन हा कार्यक्रम सर्व वयोगटांतील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना “दररोज चालूया, आरोग्य टिकवूया” हा संदेश देण्यासाठी राबविण्यात आला असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. सध्या चालण्याची सवय मर्यादित स्वरूपात म्हणजेच उद्याने किंवा सोसायट्यांपुरती असल्याने, या उपक्रमाद्वारे सामुदायिक पातळीवर चालण्याची सवय रुजविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच हा कार्यक्रम स्वातंत्र्यसेनानींनी लोकजागृती आणि समाज चळवळ उभारण्यासाठी केलेल्या पायी मोर्चांची आठवण करून देईल, असेही गोयल यांनी म्हटले आहे.
उत्तर मुंबई मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रे आणि नगर प्रभागांमध्ये या क्रीडा महोत्सवाची तयारी सुरू आहे. १० ऑक्टोबरपासून नोंदणी पोर्टल सुरू करण्यात आले असून नागरिकांना २ नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणी करण्यात येणार आहे. स्पर्धेचा अधिकृत क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करता येणार आहे. या महोत्सवात क्रिकेट, व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, कबड्डी, खो-खो, मल्लखांब, विटी-दांडू, लंगडी, लगोरी आदी खेळांचा समावेश आहे. या महोत्सवांतर्गत “खेलेगा भारत, बढ़ेगा भारत” या राष्ट्रीय घोषवाक्याखाली विविध स्पर्धा, फिटनेस ड्राईव्ह आणि शाळास्तरीय कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.