राज्यातील शाळा सोमवारपासून; १५ ते १८ वयोगटातील मुलांचे शाळेतच लसीकरण

मुंबई: येत्या सोमवारी २४ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी दिली. करोनाचा प्रादुर्भाव आणि इतर बाबी पाहून शाळा सुरू करण्यासंदर्भातील सर्व निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आले आहेत. तसेच १५ ते १८ वयोगटातील मुलांचे शाळेतच लसीकरण करण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. मात्र शाळा सुरू करण्याचे सर्वाधिकार स्थानिक प्राधिकरणावर सोपविण्यात आल्याने नवा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. महाविद्यालयेसुद्धा याच महिन्यात सुरू होेणार असून त्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी राज्यात करोनाचा विशेष: ओमायक्रॉनचा लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेऊन राज्यातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र गेल्या काही दिवसांत करोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असून रुग्णसंख्या घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी विविध घटकांतून केली जात होती. त्यानुसार शिक्षण विभागाने पाठविलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे करोनाचे सर्व नियम पाळून बालवाडी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत. पालकांची संमती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. मुलांचे आरोग्य, सुरक्षितता याला प्राधान्य देण्यात येत असून त्या दृष्टीने निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिक परिस्थितीचे वेळोवेळी अवलोकन करून शाळांबाबत निर्णय घेण्याच्या सूचना स्थानिक प्राधिकरणास देण्यात आल्या आहेत, तर महाविद्यालयेसुद्धा येत्या सोमवारपासूनच सुरू होणार असून त्याबाबतचे आदेशही लवकरच काढण्यात येणार असल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून महाविद्यालयांचा निर्णय घेतला जाणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

मुंबईतील शाळा सोमवारपासून

शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले असून त्यानुसार मुंबईतील पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.