मुंबई : भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांच्या कुटुंबीयांच्या क्रिस्टल कंपनीने पुणे महापालिकेला पुरविलेल्या कंत्राटी सुरक्षारक्षकाने तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने सोमवारी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अश्विन वसंत पवार असे या सुरक्षारक्षकाचे नाव असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रीय मजदूर संघाने या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे.

पुणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सुरक्षारक्षक पुरविण्याचे कंत्राट प्रसाद लाड कुटुंबीयांच्या क्रिस्टल कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीकडून सुमारे १५०० सुरक्षारक्षक महापालिकेस पुरविण्यात आले आहेत. महापालिकेचे दवाखाने, रुग्णालये, उद्याने, महापालिकेच्या विविध विभागांच्या इमारती, कार्यालये यांच्या सुरक्षेचे काम त्यांना देण्यात आले आहे. अश्विन पवार यांची टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून कंपनीकडून पगार थकविण्यात आल्याने सुरक्षारक्षक पवार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सोमवारी उघडकीस आले. महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पवार यांच्यावर ही वेळ आली असून अधिकारी हे कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील िशदे यांनी केला आहे. सुरक्षारक्षकांना कामगार कायद्यांतर्गत कोणतेही लाभ दिले जात नाहीत. त्याबाबत सातत्याने तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही.

प्रसाद लाड हे भाजप उपाध्यक्ष असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांचा दबदबा आहे. त्यामुळे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारीही लाड कुटुंबीयांच्या कंपनीवर कारवाई करण्यास कचरत असून त्यांची मनमानी सुरू आहे.

लाड यांच्या कुटुंबीयांच्या क्रिस्टल कंपनीकडे अनेक शासकीय आस्थापना, कार्यालये आणि इमारतींसाठी सुरक्षारक्षक आणि अन्य कामांची जबाबदारी गेल्या काही वर्षांत सोपविण्यात आली आहे. सुरक्षारक्षकांचे पगार तीन महिने का थकविण्यात आले, पालिकेने कंत्राटदारास सुरक्षा व्यवस्था पुरविण्याबाबत कंत्राटातील रक्कम अदा केली होती की नाही, यासह अन्य मुद्दय़ांबाबत क्रिस्टल कंपनीशी संपर्क साधला असता कोणीही संचालक कार्यालयात उपस्थित नाहीत आणि वरिष्ठ अधिकारीही बोलणार नाहीत, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. प्रसाद लाड यांच्याशी अनेकदा संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. लाड हे राज्यसभा निवडणुकीच्या पक्षाच्या कामात व्यस्त असल्याचे त्यांच्या स्वीय सहायकाने नमूद केले. लाड यांच्या कंपनीला भाजप सरकारच्या काळात पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कामे देण्यात आली होती. या साऱ्या कामांची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती.