मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पूरग्रस्त जिल्ह्यांतील शाळांना स्थानिक प्रशासन किंवा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सुट्टी जाहीर केली होती. परिणामी, जिल्ह्यांमध्ये शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ही परीक्षा १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान घेण्यात येणार आहे.
राज्यामध्ये २४ ते २७ सप्टेंबरदरम्यान ‘शासकीय रेखाकला परीक्षा २०२५’ घेण्यात आली. मात्र या कालावधीमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी, स्थानिक प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शाळांना सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये शासकीय रेखाकला परीक्षा रद्द करण्यात आली होती. परीक्षेला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाने पूरग्रस्त जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासकीय रेखाकला परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.
पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये आता १ ते ५ ऑक्टाेबरदरम्यान ही परीक्षा घेण्यात येणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका संंबंधित केंद्राच्या लॉगिनमध्ये एक दिवस अगोदर उपलब्ध करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी नोंदणी केलेला कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी सर्व संबंधित शिक्षक, विद्यार्थी, पालक, सहभागी शाळांना सूचना देण्यात यावी, असे आदेश कला शिक्षण मंडळाने सर्व केंद्र प्रमुखांना केल्या आहेत. २४ ते २७ सप्टेंबरदरम्यान झालेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचा १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या परीक्षेसाठी वापर करू नये. या प्रश्नपत्रिकांचा वापर झाल्याचे आढळल्यास अशा विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका रद्द करण्यात येतील. याची सर्व जबाबदारी केंद्र प्रमुखाची असेल, असेही महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
असे आहे परीक्षेचे वेळापत्रक
१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते १ या कालावधीत वस्तूचित्र, तर दुपारी २ ते ४ या कालावधीत स्मरणचित्र परीक्षा होणार आहे. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते १ या कालावधीत संकल्पचित्र – नक्षीकाम आणि दुपारी २ ते ४ या कालावधीत कर्तव्यभूमिती व अक्षरलेखन, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते १ या कालावधीत स्थिरचित्र आणि दुपारी २.३० ते ४.३० या कालावधीत स्मरणचित्र त्याचप्रमाणे ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते १.३० या कालावधीत संकल्पचित्र नक्षीकाम आणि दुपारी २.३० ते ५.३० या कालावधीत कर्तव्य भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन या विषयाची परीक्षा होणार आहे.