कोंडीत सापडलेल्या ‘ईडी’ला दिलासा

मुंबई : मुंबईसह राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून सर्वसामान्य जनतेस त्रास होऊ नये, अशी विनवणी पोलीस आयुक्तांनी केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी स्वतहून सक्तवसुली कार्यालयात जाण्याचा आपला पूर्वघोषित कार्यक्रम शरद पवार यांनी रद्द केला.

यामुळे कोंडीत सापडलेल्या ‘ईडी’ला दिलासा मिळाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर या प्रकरणास राजकीय वळण देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पुरेसे यश आल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे, तर हा केवळ सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न आहे अशा शब्दांत भाजपने या घडामोडींची खिल्ली उडविली.

राज्य बँकेच्या गैरव्यवहाराशी काहीही संबंध नसताना माझ्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला. विरोधी पक्षाच्या प्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका पवार यांनी भाजपचे नाव न घेता केली.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने बँकेच्या संचालक मंडळाबरोबर शरद पवार यांच्यावरही गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यभर त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटले. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्य़ाबाबत विचारणा करण्यासाठी आपण स्वतच शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात जाणार आहोत, असे पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते.

शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे पोलीस व ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला होता. ईडी कार्यालयाच्या आवारात जमावबंदी जाहीर करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळीच मुंबईतील पवार यांच्या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, नवाब मलिक, आदी नेते दाखल झाले होते. बाहेर कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने जमले होते. एक वाजता पवार ईडीच्या कार्यालयाकडे निघतील असे सांगितले जात होते. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे त्या आधीच पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. मुंबई व राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत त्यांनी पवार यांच्याशी चर्चा केली व ईडी कार्यालयात जाऊ नये अशी विनंती केली.

नंतर पवार यांनी स्वत प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली भूमिका जाहीर केली. मुळात महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचा मी आयुष्यात कधीही संचालक वा सभासदही नव्हतो, तरीही इतर संचालकांबरोबर माझ्यावरही गुन्हा दाखल केला, असे ते म्हणाले. राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्यासाठी मी राज्यात प्रवासात असेन. उसंत मिळणार नाही. परंतु, मी या परिस्थितीला सामोरे जायला तयार नाही, असा कुणी अर्थ काढू नये, म्हणून मी स्वत ईडीच्या कार्यालयात जाऊन माझी भूमिका सांगण्याचे व त्यांना सहकार्य करण्याचे ठरविले होते. त्यासंबंधी ईडीला पत्र पाठविले होते. त्यावर रात्री ईडीकडूनही उत्तर आले. आम्ही तुम्हाला बोलावले नाही, त्यामुळे आपण ईडी कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही, पुढे मागे गरज पडली तर तशी पूर्वसूचना देऊ, असे त्यांनी कळविले असल्याची माहिती पवार यांनी दिली.

राज्य शासनाच्या वतीने मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी आपली भेट घेऊन चर्चा केली. ईडीच्या या कारवाईमुळे मुंबई आणि काही शहरांमध्ये, जिल्ह्य़ांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे कायदा व सुवव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.त्याचबरोबर पुणे परिसरातील पूरग्रस्तांची विचारपूर करण्यासाठी आपण आता लगेच निघत आहोत, असे त्यांनी जाहीर केले.

मी स्वत: राज्यात गृहखात्याचा प्रमुख म्हणून अनेकदा जबाबदारी सांभाळली आहे. माझ्या एखाद्या कृतीमुळे कुठे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि त्याची सर्वसामान्य माणसाला किंमत मोजायला लागू नये, यासाठी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास मी स्थगित केला आहे.  – शरद पवार,

काँग्रेस, शिवसेनेचे आभार

..काही कारण नसताना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, अशा वेळी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पाठिंबा दिला, मी त्यांचे आभार मानतो, असे पवार यांनी नमूद केले.