राष्ट्रवादी काँग्रेसशी समझोता करण्याचा कोणताही प्रश्नच उद्भवत नसल्याचे प्रतिपादन करीत शरद पवार-नरेंद्र मोदी भेटीचा विषय आता संपला आहे, असे ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केले.
आमची पाच पक्षांची महायुती असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसव्यतिरिक्त अन्य पक्षाचा समावेश मात्र या युतीमध्ये होऊ शकतो, असे सूचक वक्तव्य मुंडे यांनी केले. त्यावरून मनसेच्या महायुतीत समावेशाचा मुद्दा अजून संपलेला नाही, असे दिसून येत आहे.
नितीन गडकरी यांनी शरद पवारांशी समझोता करण्याचे प्रयत्न चालविले आहेत आणि मुंडे यांचा त्यास विरोध आहे, अशा बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर मुंडे यांचा विरोध डावलून भाजपकडून पावले टाकली जातील का, असे विचारता ते म्हणाले की गोपीनाथ मुंडे, गडकरी या व्यक्ती आहेत. पण राष्ट्रवादी हा पक्ष आहे. त्यांना बरोबर घेतले जाणार नाही, हा भाजपचा निर्णय असल्याचे मुंडे यांनी मुंबई प्रदेश कार्यालयात पत्रकारांना सांगितले.