मुंबई : नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून त्यानिमित्ताने शहरातील बाजारपेठांना लकाकी आली आहे. दांडिया – गरबा, कपडे, दागिन्यांच्या खरेदीसाठी महिलांची बाजारात गर्दी होऊ लागली आहे. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत खास लाकडापासून बनवलेले रंगीत दागिने महिलांना भुरळ घालू लागले आहेत. भुलेश्वर बाजारात १५० रुपयांपासून ५३० रुपयांपर्यंत विविध दागिने उपलब्ध आहेत. त्यात दरवर्षीप्रमाणे कवडीपासून बनवलेले, आरसे लावलेले आणि फायबरच्या चंदेरी मण्यांपासून सजवलेले दागिने महिलांना आकर्षित करत आहेत. तसेच, लाकडापासून बनवलेले घुबड, ढोलकी, मोर असे पदक असलेले गळ्यातले दागिनेही लक्ष वेधून घेत आहेत.

गणेशाचे विसर्जन होताच आता नवरात्रोत्सवासाठी मंडळांची लगबग सुरु झाली आहे. स्त्रीशक्ती, सौंदर्य, मातृत्व आणि सामर्थ्याचा जागर होणाऱ्या या उत्सवाची महिलांना वर्षभर प्रतीक्षा असते. तसेच, दांडिया व गरब्यासाठी पुरुषवर्गही उत्साही असतो. दांडिया व गरब्यासाठी चनिया चोलीला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. नवरात्रीतील नऊ रंगांनुसार जुळणारे कानातले, गळ्यातले, बांगड्या, कडे आदींना या काळात मोठी मागणी असते. त्यानुसार आता बाजारात हलके, ट्रेंडी, रंगीबिरंगी दागिने विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. भुलेश्वर बाजारात नवनवीन डिझाईनच्या दागिने खरेदीसाठी महिलावर्गाची गर्दी होऊ लागली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑक्सिडाईज्ड दागिन्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ऑक्सिडाईज्ड पेंडंट व रंगीत खडे असलेल्या माळा ६०० रुपये डझन दराने विकल्या जात आहेत. तसेच, प्लास्टिकच्या, कवड्यांच्या दागिन्यांची ७२० रुपये डझन दराने विक्री होत आहे. रंगीबेरंगी गोंड्यांच्या जोड असलेल्या ऑक्सिडाईज्ड माळा ८४० रुपये रुपये, मोरपंखाच्या पदकासह रंगीत गोंडे असलेले धातूचे गळ्यातले २४०० रुपये डझन दराने विकले जात आहेत. तसेच, मण्यांच्या तीनपदरी लांब माळाही महिलांच्या पसंतीस उतरत आहेत. पारंपरिक राणीहारांना आधुनिकतेची जोड देऊन तयार केलेले ऑक्सिडाईज्ड दागिनेही लक्ष वेधून घेत आहेत. तसेच, कवडे, आरसे आणि रंगीत गोंडे असलेले कमरपट्टे १५० ते २८५ रुपयांमध्ये उपलब्ध होत आहेत. मोबाईल ठेवण्यासाठी खिसा असलेले कमरपट्टे ३२० रुपयांना मिळत आहेत. प्लास्टिकच्या कवड्यांपासून बनवलेले कडे ६० रुपये, तर काच, आरसे, कवडे असलेलया हातातल्या कड्यांची २०० रुपयांना विक्री होत आहे.

सणासुदीचा काळ असल्यामुळे बाजारात गर्दी होऊ लागली आहे. लाकडापासून बनवलेले ढोलकी, मोर, घुबड, पोपट, सुतळीचे नक्षीकाम असलेले दागिनेही महिलांना प्रचंड आकर्षित करत आहेत, एका घाऊक व्यापाऱ्याने सांगितले.