मुंबई : शिवसेनेच्या दहिसरमधील माजी नगरसेविका, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी आम्हाला फसवून एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नेले, मातोश्रीवर जायचे असल्याचे सांगून दोन बसगाड्या भरून कार्यकर्त्यांना नेले. नंदनवन येथे जाईपर्यंत आम्हाला यातले काहीही माहिती नव्हते, आमच्याकडून फसवून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षऱ्या घेतल्या असा गौप्यस्फोट दहिसरमधील एका महिला कार्यकर्तीने शिवसैनिकांच्या मेळाव्यात केला आहे.
दहिसरमधील शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे या आठ दिवसांपूर्वी शिंदे गटात सामील झाल्या. त्यापूर्वी दोनच दिवस आधी म्हात्रे यांनी बंडखोरांवर अत्यंत वाईट शब्दात टीका केली होती. मात्र अचानक १२ जुलैला सायंकाळी व्हाटसॲपवर मेसेज टाकून त्यांनी स्वतःहून शिंदे गटात जात असल्याचे जाहीर केले होते. रात्री आठ वाजता शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांसह जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात एका कार्यकर्तीने घडलेली हकीकत सांगितली आहे. दहिसरमधील माजी नगरसेवक व शीतल म्हात्रे यांचे कट्टर विरोधक अभिषेक घोसाळकर यांनी याबाबतची ध्वनिचित्रफित समाजमाध्यमांवर टाकली आहे.
या ध्वनिचित्रफितीत ती महिला म्हणते, मातोश्रीवर जायचेय असे सांगून आम्हाला नेण्यात आले. दोन बसमधून कार्यकर्त्यांना नेण्यात आले होते. एक बस आधीच गेली होती. दुसऱ्या बसमध्ये आम्ही बसलो. बस निघाली काही वेळाने मला झोप लागली जाग आली तेव्हा वांद्रे निघून गेले होते. आम्ही विचारले तर एका कार्यकर्त्याने सांगितले मॅडमनी दुसरीकडे यायला सांगितले आहे. तरीही आम्हाला संशय आला नाही. मॅडम जेथे बोलावतात तेथे आम्ही शंका न घेता जातो, तशाच निघालो, असेही त्या म्हणाल्या. पुढे गाडी मलबारहिलला गेली, नंदनवन निवासस्थानी गेली असता आमच्यापैकी एक जण म्हणाली मी नाही येणार. मात्र तेवढ्यात गाडी प्रवेशद्वारातून आत गेली. त्यानंतर आमच्यापैकी पाच जणींना सभागृहात नेण्यात आले आणि सभागृहाला बाहेरून कडी लावण्यात आली. या ठिकाणी मोबाईलचे नेटवर्कही नव्हते. तेथे एकनाथ शिंदे यांचा विजय असो अशा घोषणा ऐकू आल्यानंतर आमच्या लक्षात आले, असे त्या महिलेने चित्रफितीमध्ये सांगितले आहे.
आम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला जाऊ दिले नाही. पोलीसांची व प्रसारमाध्यम प्रतिनिधींची गर्दी असल्यामुळे आम्हाला निघून येता आले नाही. दुसऱ्या दरवाजाने जाण्यास सांगितले. या दरवाजात आमच्याकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षऱ्या घेतल्या, असेही त्या म्हणाल्या. हा सगळा घटनाक्रम घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाखेत जाऊन आम्ही अन्य सहकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला, असेही त्यांनी सांगितले.