मनसेच्या आरोपामुळे शिवसेना-भाजपची कोंडी

पालिका प्रशासनाने सभागृह नेत्यांना न दिलेले मैदान ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून या प्रकाराचे पडसाद स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत उमटले. शिवसेना नव्हे, तर चक्क मनसेने या प्रश्नाला बैठकीत वाचा फोडल्याने उभय पक्षांमधील भाऊबंदकी उघडकीस झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र मनसेची ही एक राजकीय गुगली ठरली असून सत्ताधारी शिवसेना आणि भाजप गारद झाले.

पालिका सभागृहात मैदानांच्या दत्तक विधानावर शिवसेना-भाजपने शिक्कामोर्तब केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणाला स्थगिती देत २३५ मैदाने ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेने २१६ मैदानांची यादी तयार केली असून या यादीत वडाळा येथील एक मैदान सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांच्या मधुकर विश्वासराव शिक्षण संस्थेला देण्यात आल्याचे नमुद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात हे मैदान आपल्या ताब्यात नसल्याचा खुलासा तृष्णा विश्वासराव यांनी केला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे सभागृह नेत्यांच्या ताब्यात नसलेल्या मैदानाचा यादीत समावेश कसा करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला.

या प्रकारामुळे मैदानांच्या यादीबाबत संभ्रम निर्माण झाला असून या प्रकरणाची चौकशी करावी. पालिका आयुक्तांनी विविध चौकशीच्या अहवालाप्रमाणे मैदानाची ही यादी पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करावी, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली.या प्रकरणाची चौकशी करुन संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी व यामागे भाजप नेत्यांचा हात असल्यास तेही उघड करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली.

या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते मनोज कोटक यांनी केली.

तर शिवसेना नगरसेविका अनुराधा पेडणेकर, किशोरी पेडणेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासन स्पष्टीकरण देत नसेल तर बैठक तहकूब करावी, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली.

आपण १९९७ मध्ये खेळाचे मैदान आणि शैक्षणिक आरक्षण असलेले असे दोन भूखंड पालिकेकडे मागितले होते. शाळेच्या भूखंडासाठी पाच हजार रुपये पालिकेत भरले, तर खेळाच्या मैदानासाठी करारपत्र तयार केले. मात्र त्यानंतर हे भूकंड देता येणार नाहीत, असे पालिकेने आपल्याला कळविले. त्यामुळे आजघडीला एकही भूखंड आपल्या ताब्यात नाही. मैदानांच्या यादीत आपल्या नावाचा उल्लेख करुन आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

 तृष्णा विश्वासराव, सभागृह नेत्या