राज्यात सरकार स्थापन करण्यावरून गेल्या पंधरा दिवसांत जे काही राजकारण झाले त्याचे पडसाद येत्या काळात पालिकेच्या राजकारणातही उमटणार आहेत. महापौर पदाच्या निवडणुकीपासूनच कदाचित त्याची झलक पाहायला मिळू शकेल. पालिकेत शिवसेनेचे संख्याबळ सर्वात जास्त असल्यामुळे शिवसेनेची सत्ता जाणार नसली तरी शिवसेनेची पदोपदी कोंडी करण्याची संधी आता भाजप सोडणार नाही.

मुख्यमंत्री पदावरून झालेल्या राजकीय घडामोडीनंतर सेना आणि भाजपची युती तुटल्यात जमा आहे. सेनेच्या भूमिकेमुळे भाजपला सत्तेला मुकावे लागले. त्यामुळे येत्या काळात भाजप पालिकेत शिवसेनेला खिंडीत गाठण्याचीच जास्त शक्यता आहे.

येत्या २१ नोव्हेंबरला महापौर पदाची अडीच वर्षांची मुदत संपणार आहे. नव्या महापौरांच्या निवडीच्या वेळीच भाजप ‘हीच ती वेळ’ साधण्याची शक्यता आहे.

सन २०१७ मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना व भाजप स्वतंत्र लढले होते. या निवडणुकीत सेनेचे ८४ व भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले

होते. ज्यांचे बहुमत त्यांचा महापौर असतो. त्या वेळेस विरोधकांमध्ये मोठी फूट पाडून भाजपला पालिकेत सत्तापालट करणे शक्य होते. तसेच दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याने विरोधी पक्षनेतेपद मिळवणेही शक्य होते. मात्र भाजपने पहारेकऱ्यांची भूमिका घेत शिवसेनेला अप्रत्यक्ष मदतच केली होती. आता मात्र भाजप काय करणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

पालिकेतील सत्ता जाऊ  नये म्हणून आधीच शिवसेनेने सावध पावले उचललेली आहेत.  सेनेने मनसेचे सहा नगरसेवक फोडल्यामुळे तसेच पुढे जात प्रमाणपत्र पडताळणी व पोटनिवडणुकांमध्ये विजयी होत सेनेचे संख्याबळ ९४ केले आहे. पालिकेतील सत्ता मजबूत असल्यामुळेच शिवसेनेने राज्यात ही खेळी खेळली आहे.

भाजप विरोधकाच्या भूमिकेत?

सेनेवर सूड उगवण्यासाठी भाजप मुंबई महापालिकेत विरोधी पक्षाच्या बाकांवर बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येऊ  शकते. २२ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या महापौर पदासाठी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार सेनेची स्थिती मजबूत असली तरी भाजप स्वत: महापौर पदासाठी उमेदवार उभा करून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने पालिकेत सत्तापालट घडवू शकतो. किंवा काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करून सेनेचा महापौर पदाचा उमेदवार पाडू शकतो, अशी बदलती राजकीय समीकरणे तयार होऊ  शकतात.

पक्षीय बलाबल

* शिवसेना : तीन अपक्षांसह ९४  * भाजप : ८२ अधिक २  * काँग्रेस : ३०

* राष्ट्रवादी : ८ * समाजवादी पक्ष : ६ * एमआयएम : २ * मनसे : १