नारायण राणे यांची टीका; शरद पवार यांच्या भूमिकेबाबत साशंकता व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिंतोडे उडविणाऱ्या शिवसेनेची केंद्र व राज्य सरकारमधून भाजपने वास्तविक हकालपट्टी केली पाहिजे. पण भाजपकडूनही काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली जात नाही, अशा शब्दांत आश्चर्य व्यक्त करीत, शिवसेनेने कितीही इशारे दिले तरी सत्तेसाठी लाचार असल्याने शिवसेना सत्ता सोडणार नाही, असा थेट हल्ला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी शिवसेनेवर चढविला. शिवसेनेने पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादी सरकारला पाठिंबा देणार नाही, या शरद पवार यांच्या वक्तव्याबद्दल राणे यांनी साशंकता व्यक्त केली.
गोध्रा आणि अहमदाबादमधील हत्याकांड एवढीच नरेंद्र मोदी यांची जगाला ओळख असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. हा एक प्रकारे भारताच्या पंतप्रधानांचा अपमान आहे. भाजपने शिवसेनेला तात्काळ घरचा रस्ता दाखविणे आवश्यक होते. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाल्यावर शिवसेनेने भाजपला सत्ता सोडण्याचा सल्ला देणे हास्यास्पद आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेचा वापर दोन्ही पक्षांकडून होणे अपेक्षित असताना शिवसेना आणि भाजपचे नेते आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. केंद्रात चांगली खाती आणि राज्यात जादा मंत्रिपदे मिळावीत म्हणून शिवसेना दबावाचे राजकारण करीत असल्याचा आरोप राणे यांनी केला.
शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास राष्ट्रवादी सरकारला पाठिंबा देणार नाही या शरद पवार यांच्या विधानाबद्दल त्यांनी साशंकता व्यक्त केली. शरद पवार यांनी हो म्हटल्यावर हे नाही समजावे, असे राणे म्हणाले. सरकार टिकेल, पण चालेल की नाही हे सांगता येत नाही, या पवार यांच्या विधानाशी सहमत आहे, असे ते म्हणाले.
सत्तेत आल्यावर महागाई कमी करू, असे आश्वासन भाजपने प्रचाराच्या काळात दिले होते. डाळींची किंमत २०० रुपयांवर गेल्याबाबत ‘लोकसत्ता’च्या अंकात प्रकाशित झालेल्या वृत्ताचा हवाला देत राणे यांनी, ‘या आश्वासनाचे काय झाले’, असा सवाल भाजपला केला.