अमोल कीर्तिकरांच्या विरोधात अवघ्या ४८ मतांनी जिंकलेले शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) न्यायालयात सी समरी रिपोर्ट दाखल करण्यात आला. या अहवालात मुंबई महापालिकेने वायकरांच्या विरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. तसंच रवींद्र वायकरांविरोधातले गुन्हे मागे घेतल्याचीही माहिती आहे. काय म्हटलं आहे मुंबई पोलिसांनी अहवालात? रवींद्र वायकरांविरोधातलं प्रकरण हे गैरसमजुतीतून आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे दाखल करण्यात आलं होतं. जोगेश्वरी येथील आलिशान हॉटेलच्या बांधकाम प्रकरणी रवींद्र वायकर अडचणींत आले होते. मात्र त्यांच्या विरोधात मुंबई महापालिकेने दिलेली तक्रार अपूर्ण माहितीच्या आधारे दिली गेली. या प्रकरणात रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे पण वाचा- “…तर रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ दिली जाणार नाही”, संजय राऊतांचं वक्तव्य किरीट सोमय्यांनी रवींद्र वायकरांविरोधात काय आरोप केला होता? महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकीत हॉटेल बांधण्याचा घाट घालून ५०० कोटींचा भूखंड घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. या गैरव्यवहारातून पालिकेचा महसूल बुडवल्याचा आरोप करत पालिका अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण काय आहे? मुंबईतील जोगेश्वरीच्या मजासवाडी भागात १३ हजार ६७४ चौरस फुटांचा भूखंड मुंबई महापालिकेच्या मालकीचा आहे. हा भूखंड मैदानासाठी आणि रूग्णालयासाठी राखीव ठेवण्यात आला होता. या भूखंडाची किंमत ५०० कोटींच्या घरात आहे. या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधलं असा आरोप झाला. विशेष बाब म्हणजे या बांधकामासाठी वायकर यांनी मुंबई महाापालिकेकडून परवानगी घेतली नव्हती, असा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी रविंद्र वायकर यांची चौकशी सुरु आहे. चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती. मात्र वायकर या चौकशीला हजर राहिले नाहीत. त्यानंतर आता ईडीकडून वायकर यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सी समरी रिपोर्ट सादर केला आहे. ज्यामध्ये मुंबई महापालिकेने गैरसमजातून आणि अपूर्ण माहितीच्या आधारे तक्रार दाखल केल्याचं म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.