मुंबई : शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या पांढऱ्या पेशी मंगळवारी अचानक कमी झाल्याने त्यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी दिली.
मागील काही दिवसांपासून संजय राऊत यांची प्रकृती ठीक नसल्याने ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. अधूनमधून फोर्टिस रुग्णालयामध्ये त्यांना तपासणीसाठी नेण्यात येत होते. त्यांची प्रकृती मंगळवारी अचानक बिघडल्याने त्यांना फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी तपासणीदरम्यान त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
सध्या त्यांची प्रकृती ठीक असून त्यांना पुढील पाच दिवस रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती सुनील राऊत यांनी दिली.
