मुंबई : अल्पवयीन मुले घर सोडून जाण्याच्या घटना वाढत आहेत. सहा वर्षांच्या मुलाने घर सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. वडील रागावल्याने तो एकटाच घर सोडून निघाला. दोन दिवसांनी तो दादर स्थानकात पोलिसांना सापडला होता. आठवड्याभराच्या शोध मोहिमेनंतर नायगाव पोलिसांना तो सापडले. हा मुलगा सुखरूप असून त्याला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

नायगाव (पूर्व) येथील पाचोरीपाडा, चिंचोटी परिसरात वास्तव्यास असलेले अविनाश रतनलाल गिरी (४१) यांचा सहा वर्षांचा मुलगा २४ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाला. सर्वत्र सोध घेऊनही तो सापडला नाही. अखेर गिरी यांनी नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलगा अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी नायगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

दादर स्थानकात आढळला मुलगा

दादर स्थानकात एकटाच फिरणारा हा मुलगा रेल्वे पोलिसांच्या दृष्टीस पडला. रेल्वे पोलिसांनी त्याची विचारपूस केली, पण त्याला आपली माहिती सांगता आली नाही. तो वाट चुकला असेल असे वाटल्याने पोलिसांनी त्याला बालगृहात दाखल केले होते.

नायगाव पोलिसांची शोध मोहीम

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नायगाव पोलिसांनी या मुलाच्या शोधासाठी गुन्हे शोध शाखेच्या दोन स्वतंत्र पथकांची नेमणूक केली. पोलिसांनी कामण रेल्वे स्थानक, वसई स्थानक, नालासोपारा, दादर आणि मुंबईतील महालक्ष्मी स्टेशन परिसरातील सुमारे २०० हून अधिक सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाची तपासणी केली. त्यावरून हा मुलगा दादर परिसरात असल्याचे लक्षात आले. पुढील तपासात तो मुलगा बालगृहात असल्याचे समजले. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले.

रागात सोडले घर, लोकल पकडून मुंबईत आला

हा मुलगा पूर्वी आई-वडिलांसोबत अनेक वेळा चालत कामण रेल्वे स्थानकापर्यंत गेला होता. त्या दिवशी रागाच्या भरात घर सोडून तो कामण रेल्वे स्थानकात पोहोचला आणि तेथून त्याने वसईच्या दिशेने जाणारी रेल्वेगाडी पकडली. वसईहून तो दादरला जाणाऱ्या लोकलमध्ये बसला. दोन दिवस तो त्याच परिसरात होता. रस्त्यावर रडत असताना तो रेल्वे पोलिसांना सापडला. पोलिसांनी त्याला बालगृहात नेले. त्यानंतर आम्हाला त्याचा माग काढता आला, असे नायगाव पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.