मुंबई : बदलती जीवनशैली आणि करोनानंतर निर्माण झालेली परिस्थिती यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता, तसेच मनोविकार तज्ज्ञांना मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य विभागाने आता समाज माध्यमांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाने प्राथमिक स्तरावर राज्यातील मानसिक आरोग्यासंदर्भातील उपचार पद्धती डॉक्टरांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्हॉट्स ॲप ग्रुप तयार केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही वर्षांपासून नागरिकांना वाढता कामाचा ताण, मानसिकदृष्ट्या तणाव, नैराश्य, चिंता या समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावू लागल्या आहेत. या समस्यांमुळे मानसिक रुग्ण झालेली व्यक्ती याबाबत कोणाशीही संवाद साधत नाही. नागरिकांना आपल्या समस्या मांडता याव्यात व त्यांच्या मानसिक आजारावर योग्य वेळी उपचार व्हावे यासाठी टेलीमानस मदतवाहिनी (हेल्पलाईन) सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत या मदतवाहिनीचा राज्यातील २० हजारांहून अधिक नागरिकांना लाभ झाला आहे. यातील एक तृतीयांश नागरिकांनी त्यांना चिंता, नैराश्य आणि मनामध्ये वारंवार आत्महत्येचे विचार मनात येत असल्याचे सांगितले. परंतु मदतवाहिनीवरून करण्यात आलेल्या समुपदेशनामुळे या नागरिकांचे आयुष्य सुकर झाले आहे.

हेही वाचा >>>रेल्वेत जवानाकडून चौघांची हत्या; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमधील थरार, आरोपी अटकेत

हेही वाचा >>>राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांचा वाद पुन्हा उच्च न्यायालयात; भूमिका स्पष्ट करण्याचे सरकारला न्यायालयाचे आदेश

मानसिक आजार सौम्य व गंभीर अशा दोन प्रकारचा असतो. सौम्य प्रकारामध्ये चिंता, नैराश्य, तणाव, झोप न येणे, मनामध्ये वारंवार आत्महत्येचा विचार येणे अशा समस्या आढळतात. या प्रकारामध्ये वेळीच संबंधित व्यक्तीवर योग्य उपचार झाल्यास गंभीर आजार टळू शकतो. त्यामुळे विविध प्रकाराच्या मानसिक रुग्णांवर कशाप्रकारे उपचार करावेत, त्यांच्या उपचारासाठी सरकारने कोणत्या योजना सुरू केल्या आहेत, रुग्णांना कोणती औषधे द्यावी, योगासने, ध्यानधारणा, समुपदेशन कसे करावे, त्याचबरोबर उपचार करताना कोणती काळजी घ्यावी आदी माहिती डॉक्टरांना देण्यासाठी आरोग्य विभागाने समाज माध्यमाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मानसिक रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, समुपदेशक, समाजसेवक, प्रशिक्षित परिचारिका यांचा स्वतंत्र व्हॉट्स ॲप ग्रुप तयार करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social media support for addressing mental health issues mumbai print news amy