मुंबई : प्रतिभावंत कलाकाराला एकावेळी अनेक कला साद घालत असतात. अशा वेळी कलाकार स्व:च्या कलाविष्कारातून दुसऱ्या कलेचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो. या कला मिलाफातून कलाकारांसह रसिकांना वेगळीच अनुभूती मिळते. अशीच एक अनोखी अनुभूती रसिकांना ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या माध्यमातून घेता येणार आहे. लिटफेस्टच्या मंचावर प्रसिद्ध नृत्यांगना सोनिया परचुरे या संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांवर नृत्याविष्कार सादर करणार आहेत.

संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या भावपूर्ण गाण्यांनी मराठी रसिकांना सहा दशके खिळवून ठेवले. आजही त्यांच्या गाण्यांची मोहिनी कायम आहे. त्यांच्या गाण्यांची हीच ‘जादू’ प्रसिद्ध नृत्यांगना आणि नृत्य दिग्दर्शिका सोनिया परचुरे या सहकलाकारांसह आपल्या ‘आनंदाचे डोही नृत्यतरंग’ या नृत्याविष्कारातून उलगडणार आहेत.

श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आपल्या नृत्यकलेतून त्यांना मानवंदना देण्यासाठी सोनिया परचुरे हा विशेष कार्यक्रम सादर करणार आहेत. मराठी नाटकांसाठी, चित्रपटांसाठी तसेच मालिकांसाठी नृत्य दिग्दर्शन करण्यासोबतच नाट्य अभिनेत्री म्हणूनही सोनिया परचुरे यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. या कार्यक्रमात सोनिया परचुरे यांच्यासह त्यांचे शिष्य नकुल घाणेकर, क्षितिजा माटे, गायत्री बहुतुले, हर्षिता मुळे आणि अर्चना रणदिवे आदी सहभागी होतील.

‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ या उपक्रमातून मराठी साहित्य, विविधांगी कला, संस्कृतीच्या ऐश्वर्याचा सौंदर्यसोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यात या अनोख्या नृत्याविष्काराची अनुभूती रसिक प्रेक्षकांना घेता येईल. हा कार्यक्रम ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ११:३० या वेळेत गडकरी रंगायतन, ठाणे येथे होणार आहे.

सुरांची मैफल

‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मध्ये ‘संध्याकाळची गाणी’ या कार्यक्रमातून रसिक प्रेक्षकांना सुरेल गाण्यांची मेजवानी मिळणार आहे. यात विविध प्रकारची गाणी सादर होणार असून या कार्यक्रमात केतकी भावे जोशी, मंदार आपटे, डॉ. जय आजगावकर आणि अर्चना गोरे आदी कलाकार सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम मुख्य सभागृह, लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले येथे ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत होणार आहे.

लोककलेचा जागर

लोककलेचा जागर करणाऱ्या विशेष कार्यक्रमांचा आस्वादही रसिक प्रेक्षकांना ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर घेता येणार आहे. यात लावणी या लोककलेला देशातच नव्हे तर जगभर पोहोचविणाऱ्या भूषण कोरगावकर यांच्या ‘लव्ह अँण्ड लावणी’ या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. शबाना अष्टुरकर या नामवंत लावणी कलावंताच्या आयुष्यावर बेतलेल्या या कार्यक्रमात मराठी, हिंदी आणि दखनी भाषेचा वापर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते आणि अभिनेता संभाजी ससाणे हे सूत्रधाराच्या भूमिकेत असतील तर शकुंतलाबाई सातारकर, पुष्पा सातारकर, गौरी जाधव, चंद्रकांत लाखे, विनायक जावळे, सुमित कुडाळकर आदी कलाकार या कार्यक्रमातून लावणीसह, कलाकाराचा प्रवास आणि संघर्ष प्रेक्षकांसमोर उलगडतील. हा कार्यक्रम ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७.३० या कालावधीत गडकरी रंगायतन ठाणे येथे होणार आहे.