मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाने नायगाव बीडीडी चाळीतील पहिल्या टप्प्यातील कामाला वेग दिला असून या टप्प्यात आठ पुनर्वसन इमारती बांधण्यात येणार आहेत. त्यातील पाच इमारतींचे काम सध्या सुरु आहे. आता लवकरच तीन पुनर्वसन इमारतींच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आठही इमारतींच्या कामाला वेग देत फेब्रुवारी २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे मंडळाचे नियोजन आहे. नियोजनानुसार काम झाल्यास फेब्रुवारी २०२६ मध्ये नायगावमधील तब्बल १४०१ रहिवाशांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल आणि ते ५०० चौ. फुटाच्या घरात, २३ मजली इमारतीत रहायला जातील.
वरळी, ना.म.जोशी मार्ग आणि नायगावमधील बीडीडी चाळींचा पुनर्विकास मुंबई मंडळाकडून करण्यात येत आहे. त्यानुसार नायगावमधील काम सध्या वेगात सुरु असल्याचा दावा मंडळाकडून केला जाता आहे. नायगावमध्ये दोन टप्प्यात पुनर्विकास करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात भूखंड ब वरील २३ चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. तर दुसऱया टप्प्यात भूखंड अ वरील १९ चाळींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामाला यापूर्वीच सुरुवात झाली आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यात भूखंड ब वर १४०१ बीडीडीवासियांसाठी २३ मजली आठ पुनर्वसन इमारती बांधण्यात येत आहेत. दुसऱया टप्प्यात भूखंड अ वर १२ पुनर्वसन इमारती बांधल्या जाणार आहेत.
हेही वाचा >>>मुंबई: चेतन सिंहला ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
त्यानुसार भूखंड ब वर आठ इमारती बांधण्यासाठी येथील ११ चाळी पाडणे मंडळाला आवश्यक आहे. आतापर्यंत मंडळाने ११ पैकी सात चाळी रिकाम्या करुन त्याचे पाडकाम पूर्ण केले असून पाच पुनर्वसन इमारतींचे काम सुरु केले आहे. मात्र उर्वरित तीन इमारतींचे काम सुरु करण्यासाठी चार इमारती पाडणे आवश्यक असताना हे पाडकाम रखडले होते. या चार इमारतीतील काही रहिवाशांनी घरे रिकामी करण्यास नकार देत न्यायालयात धाव घेतल्याने हे काम रखडले होते. मात्र बुधवारी न्यायालयाने रहिवाशांची याचिका निकाली काढत मंडळाला दिलासा दिला आहे. चार इमारतींचे पाडकाम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार आता लवकरच रहिवाशांच्या निष्कासनाची प्रक्रिया पूर्ण करत इमारतींचे पाडकाम केले जाणार असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ.याने दिली.
हेही वाचा >>>हृदयविकारावरील उपचारासाठी आरोग्य विभाग घेणार १९ कार्डियॅक कॅथलॅब! २३१ कोटी रुपयांचा प्रकल्प
या इमारतींचे पाडकाम पूर्ण झाल्यास येथे तीन पुनर्वसन इमारतींच्या कामास सुरुवात होईल. त्याबरोबरीने पहिल्या टप्प्यातील कामही वेग घेईल आणि या आठही पुनर्वसन इमारती फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण होतील असे मंडळाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे फेब्रुवारी २०२६ मध्ये नायगावमधील १४०१ रहिवाशांना हक्काचे घर मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी भूखंड अ वरील रहिवाशांना मात्र पुनर्वसित इमारतीत रहायला जाण्यासाठी काहीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण दुसर्या टप्प्यातील कामास सुरुवात होण्यासाठी काहीसा वेळ लागणार आहे.