Medical & Dental Admission / मुंबई : वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीला विलंब झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. वैद्यकीय समुपदेशन समितीचे (एमसीसी) अखिल भारतीय कोट्याच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षानेही वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार २० सप्टेंबरपासून दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे.

वैद्यकीय व दंत पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रकियेला एमसीसीकडूनच विलंब होत असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होऊ लागला आहे. वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची पहिली फेरी विलंबाने सुरू केल्यानंतर दुसरी फेरी नियमितपणे सुरू होण्याची विद्यार्थ्यांना अपेक्षा होती. मात्र नव्याने मान्यता मिळणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी दुसरी फेरी लांबणीवर टाकण्यात येत होती. अखेर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील १९ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना २० ते २२ सप्टेंबर या कालावधीमध्ये पसंतीक्रम भरण्यासाठी अवधी देण्यात आला आहे. पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी २४ सप्टेंर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. निवड यादीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना २५ ते २९ सप्टेंबर या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.

महाराष्ट्रामध्ये ६८० जागा वाढल्या

यंदा महाराष्ट्रातील तीन नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये अंधेरीतील ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय (५० जागा), श्रीमती सखुबाई नारायणराव काटकडे वैद्यकीय महाविद्यालय (१०० जागा) आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ स्कूल ऑफ मेडिसिन महाविद्यालय (५० जागा) यांचा समावेश आहे. त्याचबरोबर विविध वैद्यकीय महाविद्यालये व अभिमत विद्यापीठांमध्ये ४३० जागा वाढविण्यात आल्या आहेत. यामुळे दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना अधिक जागा उपलब्ध होणार आहेत.

पहिल्या फेरीमध्ये झालेले प्रवेश

राज्यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ८ हजार १३९ जागा असून, पहिल्या फेरीमध्ये ६ हजार ८४८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये सरकारी महाविद्यालयांमध्ये ४ हजार ४१७, तर खासगी महाविद्यालयांमध्ये २ हजार ४३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १ हजार २९१ जागा रिक्त असून, यामध्ये सरकारी महाविद्यालयांमध्ये ४०३, तर खासगी महाविद्यालयांमध्ये ७८८ जागा रिक्त आहेत.

त्याचप्रमाणे दंत अभ्यासक्रमाच्या २ हजार ७२५ जागांपैकी पहिल्या फेरीमध्ये फक्त ९६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये सरकारी महाविद्यालयांमध्ये १७१, तर खासगी महाविद्यालयांमध्ये ७९० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. दंत अभ्यासक्रमाच्या १ हजार ७६४ जागा रिक्त राहिल्या असून, यामध्ये सरकारी महाविद्यालयांमध्ये १५४ जागा, तर खासगी महाविद्यालयांमध्ये १ हजार ६१० जागा रिक्त आहेत.