मुंबई : पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे वाढून त्यांची अवस्था अधिक वाईट झालेली असतानाच मंगळवारी गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश राज्य सरकारने मुंबई महापालिकेला (बीएमसी) दिले आहेत. यामध्ये अन्य प्राधिकरणाच्या हद्दीतील खड्ड्यांचाही समावेश आहे. एमएसआरडीसीच्या हद्दीत असलेल्या वाकोला पुलावर सातत्याने खड्डे पडत असून ते बुजवण्यासाठी बराच खर्च येणार आहेत. अशा मोठ्या स्वरुपाच्या कामाचा मोबदला त्या त्या प्राधिकरणांकडे मागणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
जून महिन्यापासून खड्ड्यांच्या आठ हजारांपेक्षा अधिक तक्रारी मुंबई महापालिकेकडे आल्या असून त्यापैकी पन्नास टक्के तक्रारी ऑगस्ट महिन्यातील आहेत. यातील ८५०पेक्षा जास्त तक्रारी या अन्य प्राधिकरणांच्या हद्दीतील रस्ता किंवा पुलांवरील खड्ड्यांसंबंधी आहेत. मुंबईत एमएमआरडीए, एमएमआरसीएल, म्हाडा, बीपीटी, रेल्वे, विमानतळ अशी अनेक प्राधिकरणे असून त्यावरील तक्रारीही मुंबई महापालिकेकडे येतात. मात्र यंदा वाकोला पुलावरून खड्ड्यांमुळे या प्राधिकरणांमधील जबाबदारीच्या हद्दीचा वाद वाढला आहे. पश्चिम दृतगती मार्गाची देखभाल मुंबई महापालिका करीत असली तरी त्यावरील पुलांची देखभाल ही एमएसआरडीसीची जबाबदारी आहे. त्यामुळे मुंबई महापालिका या पुलाच्या देखभालीची जबाबदारी घेत नाही. परंतु, राज्य सरकारने मुंबई महापालिकेला अन्य सर्व प्राधिकरणांच्या हद्दीतील खड्डे भरण्याचे आदेशच दिले आहेत.
दरम्यान, याबाबत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईतील बीपीटी, विमानतळ प्राधिकरण, रेल्वे यांच्या हद्दीतील रस्त्यांची देखभाल मुंबई महापालिका कधीही करत नाही. मात्र म्हाडा, एमएसआरडीसीच्या हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजवले जातात. बीकेसीची जबाबदारीही एमएमआरडीए घेत असल्यामुळे तिथेही महापालिकेची यंत्रणा नसते. यंदा मात्र एमएसआरडीसीच्या हद्दीतील वाकोला आणि विक्रोळी पुलावरील खड्डे भरण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. त्याचे कामही सुरू झाले आहे. तसेच मानखुर्द येथील म्हाडाच्या महाराष्ट्र नगर येथील खड्डेही बुजवले जात आहेत. तर दहिसर येथील सेवा रस्त्यांवर एमएमआरसीएलच्या कामामुळे झालेले खड्डेही मुंबई महापालिका बुजवत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाकोला पुलाची दुर्दशा
वाकोला पुलाची दुर्दशा झाली असून एक खड्डा बुजवला तरी दुसरा खड्डा दुसरीकडे पडतो आहे. त्यामुळे या पुलाचे फेरपृष्ठीकरण करण्याची गरज असून ही कामे पावसाळ्याची आधी करावी लागतात. आता अचानक जबाबदारी दिल्यामुळे खडडे दिसतील तसे बुजवावे लागणार आहेत. हे काम पावसाळा संपेपर्यंत चालणार असून त्यानंतर एकूण खर्च संबंधित प्राधिकरणाला कळवला जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
बीएमसीच्या संकेतस्थळावरील तक्रारी
खड्ड्यांच्या एकूण तक्रारी – ८,७९९
अन्य प्राधिकरणाच्या रस्त्यावरील खड्डे – ८५५
ऑगस्टमधील तक्रारी – ४,४६९