मुंबई : राज्यात जुलैमध्ये सामान्य पावसाची नोंद झाली असून, मराठवाड्यात पावसाची तूट आहे. जुलै महिन्यात नाशिकमध्ये सर्वाधिक, तर सोलापूरमध्ये सर्वात कमी पाऊस पडला. यंदा २५ मे रोजी तळकोकणात मोसमी पाऊस दाखल झाला. साधारण १ जूनपासून राज्याच्या बहुतांश भागांसह किनारपट्टीवर मोसमी पाऊस सक्रिय झाला. त्यानंतर जूनचे सुरुवातीचे काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. अशीच परिस्थिती जुलैमध्ये होती.

जुलैमधील पहिल्या पंधरवड्यात राज्यात पावसाचा जोर नव्हता. या पंधरवड्यात कोकण वगळता अन्यत्र फारसा पाऊस पडला नाही. त्यानंतर २० जुलैपासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला. या कालावधीत विदर्भात मुसळधार पाऊस कोसळला. कोकणताही पावसाचा जोर होता. दरम्यान, राज्यात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत ३२४.२ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. पण, यंदा ३२७.९ मिमी पाऊस पडला. म्हणजेच सरासरीपेक्षा १ टक्का जास्त पाऊस पडला. कोकण विभागात सरासरी १७५५ मिमी पाऊस पडतो.

यंदा १७७५.८ मिमी पाऊस पडला. कोकणातील पाऊस सरासरी इतकाच म्हणजेच १ टक्क्याने अधिक आहे. मध्य महाराष्ट्रात ३८७.२ मिमी पाऊस पडतो, यंदा तो ४२४.७ मिमी झाला असून सरासरीपेक्षा १० टक्के जास्त आहे. विदर्भात ४८४.७ मिमी पाऊस पडतो. यंदा ५२९.८ मिमी झाला आहे. मराठवाड्यात ५८.४ मिमी पावसाची तूट आहे. याचबरोबर संपूर्ण देशात ४४५.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. आतापर्यंत देशात ४७४.३ मिमी पाऊस पडला आहे. म्हणजेच सरासरीपेक्षा ६ टक्के जास्त पाऊस पडला आहे.

ऑगस्टमध्ये कमी पाऊस

ऑगस्टमध्ये देशात सरासरी पावसाचा अंदाज आहे. पूर्वोत्तर राज्ये, लडाख, पूर्व भारत, मध्य भारत आणि पश्चिम किनारपट्टीवरील भाग वगळता देशात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ऑगस्ट महिन्यात कमी, तर सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ऑगस्टमध्ये देशात सरासरी इतका ९४ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, राज्यात ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाची शक्यता नाही. कोकण आणि मध्य महाराष्ट्र वगळता इतर भागात पावसाचे प्रमाण कमी राहील. त्यामुळे ऑगस्टमध्ये राज्यात सरासरी इतकाच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ऑगस्टच्या शेवटच्या दोन आठवड्यांत पावसाचा जोर वाढेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच ऑगस्टमध्ये कमाल तापमान सरासरी इतके, तर किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

एल- निनो तटस्थ

विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या एल-निनो तटस्थ स्थितीत आहे. मोसमी पावसाच्या अखेरच्या टप्प्यात ही स्थिती कायम राहणार आहे. याचबरोबर हिंद महासागरात इंडियन ओशन डायपोल (आयओडी) तटस्थ स्थितीत असून, उर्वरित मोसमी पावसाच्या हंगमात आयओडी ऋण होण्याचे संकेत आहेत.