मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने दिवाळी हंगामात १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी, पूरग्रस्तांना बाहेरगावी जाण्यासाठी एसटीच्या दरवाढीला चटका सहन करावा लागण्याची शक्यता होती. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने मंगळवारी प्रसिद्ध केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी एसटीने केलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचे निर्देश दिले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिवाळी हंगामात १५ आक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान एसटीने १० टक्क्यांची हंगामी भाडेवाढ केली होती. परंतु, परतीच्या पावसामुळे आलेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला सोसावा लागणाऱ्या आर्थिक भाराचा विचार करून एकनाथ शिंदे यांनी ही भाडेवाढ रद्द करावी, अशी सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना केली. त्यानुसार सरनाईक यांनी दिलेल्या निर्देशानुसार महामंडळाने भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जाहीर केल्यानुसार १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत साधी, निमआराम (हिरकणी), शयन आसनी, वातानुकूलित शिवशाही आणि जनशिवनेरी अशा सर्व बसगाड्यांमध्ये १० टक्के भाडेवाढ लागू होणार होती. परंतु, आता प्रवाशांना अतिरिक्त भाडे मोजावे लागणार नाही.

सणासुदीच्या काळात राज्य परिवहन प्राधिकरणाने महामंडळाला ३० टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याची मुभा दिली होती. त्यानुसार १० टक्के दरवाढीचा निर्णय महामंडळाने घेतला होता. पण राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांवर होणारा परिणाम लक्षात घेता हंगामी भाडेवाढ मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन प्रताप सरनाईक यांनी केले. या निर्णयामुळे दिवाळी सणात एसटीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

गेल्यावर्षी निवडणुकीच्या काळात मतदारांना खुश करण्यासाठी दिवाळीत होणारी हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली होती. त्यामुळे एसटीला शेकडो कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले होते. तर, ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२३ या दिवाळी हंगामाच्या कालावधीत १० टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. एसटीमधून ७५ वर्षीय ज्येष्ठांना तिकीट दरात १०० टक्के सूट, ६५ ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठांना आणि महिलांना तिकीटात ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे दिवाळीत एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. एसटीला या कालावधीत ६१५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले होते. तर, २० नोव्हेंबर २०२३ रोजी एका दिवसात ३७.६३ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. एसटीच्या इतिहासातील हे एका दिवसातील विक्रमी उत्पन्न ठरले होते. तर, २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान दिवाळी हंगामात एसटीने २१८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते.