मुंबई महापालिकेच्या सीबीएसई व आयसीएसई मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थी यंदा प्रथमच दहावीच्या परिक्षेला बसणार आहेत. २०२० मध्ये केवळ इयत्ता सहावीपर्यंत सुरू झालेल्या दोन शाळांतील विद्यार्थी आता दहावीपर्यंत पोहोचले आहेत. जोगेश्वरी पूर्वेकडील पूनमनगर सीबीएसई शाळा आणि माहीमची वुलन मिल आयसीएसई शाळा या दोन शाळांतील पालिकेचे विद्यार्थी यंदा दहावीची परीक्षा देणार आहेत. ही खऱ्या अर्थाने पालिकेच्या शिक्षण विभागाचीच कसोटी ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत सन २०२० मध्ये पालिकेच्या शिक्षण विभागाने केंद्रीय मंडळांच्या शाळा सुरू केल्या. जोगेश्वरी पूर्वेकडील पूनमनगर शाळेमध्ये मुंबई पब्लिक स्कूल (पालिकेची शाळा)मध्ये सीबीएसईची पहिली शाळा सुरू झाली. त्याचवर्षी पालिकेने माहीमच्या वुलन मिल शाळेमध्ये आयसीएसई मंडळाची शाळा सुरू केली होती. या दोन्ही शाळांना ज्युनिअर केजी ते सहावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याची तेव्हा परवानगी मिळाली होती. नंतर दरवर्षी पुढच्या इयत्तांसाठी परवानगी घेऊन आता या शाळा दहावीपर्यंत चालवल्या जातात. पहिल्या वर्षी सहावीला असलेले विद्यार्थी यंदा दहावीपर्यंत पोहोचले असून ते यंदा दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत. पालिकेच्या केंद्रीय मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला प्रथमच बसणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या शिक्षण विभागासाठी ही एक मोठी घटना आहे.

या दोन्ही शाळांमध्ये दहावीची एकेक तुकडी असून त्यात प्रत्येकी ३८ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांची दहावीच्या परिक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया करण्याचा आम्हाला अनुभव नव्हता. त्यामुळे नोंदणीसाठी केंद्रीय मंडळाकडे खूपदा पाठपुरावा करावा लागला. मुदत उलटून गेलेली असली तरी आम्ही केंद्रीय मंडळाला विनंती पत्र पाठवले होते. मुंबई महापालिका मोफत शिक्षण देत असल्यामुळे केंद्रीय मंडळाने विनंती मान्य केली व विलंब शुल्क न आकारता विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेतली, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. तसेच पुढील वर्षी पालिकेच्या एकूण १२ केंद्रीय मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थी दहावीला बसणार असून या सगळ्या विद्यार्थ्यांची दहावी परिक्षेची नोंदणी आधीच करण्यात आली असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

२०२१ मध्ये पालिकेने सीबीएसईच्या आणखी दहा शाळा सुरू

प्राथमिक शिक्षण हे मुंबई महानगरपालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्पही दरवर्षी मांडला जातो. मात्र गेल्या काही वर्षात मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षणाच्या पलिकडे जाऊन शैक्षणिक सोयी, सुविधा, संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याअंतर्गत २०२० मध्ये पालिकेने प्रथमच केंद्रीय मंडळाच्या शाळा सुरू केल्या. २०२१ पासून या शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या. सीबीएसई, आयसीएसई नंतर आयबी व आयजीसीएसई या आंतरराष्ट्रीय मंडळाच्या शाळाही सुरू करण्यात आल्या. सर्वसामान्य घरातील मुलांना केंद्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मंडळाच्या खासगी शाळांचे खर्च परवडत नसल्यामुळे पालिकेने या शाळा सुरू केल्या होत्या. त्यानंतर २०२१ मध्ये पालिकेने सीबीएसईच्या आणखी दहा शाळा सुरू केल्या. या शाळांना पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे या शाळांमध्ये प्रवेशासाठी सोडत काढावी लागत.

पूनमनगर व वुलनमिलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून आम्ही खूप मेहनत घेतली आहे. आम्ही अन्य खासगी शाळांमधील शिक्षकांचीही यात मदत घेतली आहे. प्राची जांभेकर, उपायुक्त, शिक्षण

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students of bmc cbse and icse schools will appear for 10th class examination for the first time mumbai print news zws