ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या आईला एक भावनिक पत्र लिहिलं. त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. या पत्रात त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीपासून ईडीची कारवाई आणि जबरदस्तीने घेतलेले जबाब अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला. यावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया आल्या. अशातच संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेनेचे आमदार सुनिल राऊत यांनीही या पत्रावर आपली भावना व्यक्त केली. ते बुधवारी (१२ ऑक्टोबर) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.

सुनिल राऊत म्हणाले, “संजय राऊत आणि आईचं विशेष नातं आहे. आई आणि मुलात काय प्रेम असतं हे सर्वांना माहिती आहे. आमचं संयुक्त कुटुंब आहे. मागील ६१ वर्षात संजय राऊत कधीही आईपासून एवढा मोठा अडीच महिन्यांचा काळ दूर राहिले नाहीत.”

“संजय राऊत आणि आईची अडीच ते पावणे तीन महिन्यांपासून भेट नाही”

“ते दौऱ्यावर किंवा कामानिमित्त बाहेर गेले, तर चार ते पास दिवस किंवा जास्तीत जास्त आठ दिवस बाहेर राहायचे. मात्र, आत्ता ईडीने अटक केल्यामुळे संजय राऊत आणि आईची अडीच ते पावणे तीन महिन्यांपासून भेट नाही. त्यामुळे या भावनिक पत्रातून त्यांचं आईप्रति प्रेम त्यांनी व्यक्त केलं. तसेच त्यांच्या भावना पत्रातून आईला कळवल्या,” असं सुनिल राऊत यांनी सांगितलं.

“सोडून गेलेले ४० आमदार उद्या वर गेल्यावर बाळासाहेबांना काय तोंड दाखवणार”

सुनिल राऊत पुढे म्हणाले, “संजय राऊत यांचे ३०-३२ वर्षे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर गेले आहेत. आज जे ४० आमदार शिवसेना सोडून गेले, ते उद्या वर गेल्यावर बाळासाहेब ठाकरेंना काय तोंड दाखवणार आहेत.”

“संजय राऊत भाजपासमोर झुकले असते, तर तेही आज घरी असते”

“परंतु संजय राऊत जेव्हा वर जातील तेव्हा बाळासाहेबांना निष्ठेने सांगतील की, तुमचा हा निष्ठावंत सैनिक झुकला नाही, गुडघे टेकले नाहीत आणि शिवसेना सोडली नाही. याच निष्ठेने ते आज तुरुंगात आहेत. ते भाजपासमोर झुकले असते, तर तेही आज घरी असते,” असं मत सुनिल राऊत यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “बंदुकीचा धाक दाखवत माझ्याविरोधात…” संजय राऊतांचं आईला भावनिक पत्र

“आई ८४ वर्षांची असल्याने प्रत्येक सुनावणीला येऊ शकत नाही”

“माझी आई ८४ वर्षांची आहे. त्यामुळे ती कोर्टाच्या प्रत्येक सुनावणीला येऊ शकत नाही. जेव्हा मला संजय राऊत भेटतात, त्यावेळी ते मला दोनच प्रश्न विचारतात. आपला शिवसेना पक्ष कसा आहे, उद्धव ठाकरे कसे आहेत आणि दुसरं म्हणजे आई कशी आहे,” असंही सुनिल राऊतांनी नमूद केलं.