मुंबई : मुंबईमधील भटक्या कुत्र्यांचे जानेवारी २०२४ मध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. दर १० वर्षांनी श्वानगणना करण्यात येते. यापूर्वी २०१४ मध्ये श्वानगणना करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या १० वर्षांत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली की कमी झाली ते कळू शकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे रात्री-अपरात्री वयोवृद्ध नागरिक, लहान मुले, महिला यांना रस्त्याने चालताना भीती वाटते. अनेकदा कुत्रे पादचाऱ्यांवर हल्ला करतात. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रम अर्थात भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण किंवा नसबंदी करण्याचा कार्यक्रम १९९४ मध्ये हाती घेतला होता. मात्र विविध कारणांमुळे हा कार्यक्रम रखडला आहे. सध्या मुंबईत नक्की किती भटके कुत्रे असतील याबाबत कोणतीही गणना केलेली नाही. दर १० वर्षांनी ही गणना केली जात असून पुढील वर्षी कुत्र्यांची गणना करण्याचे महानगरपालिकेच्या संबधित विभागाने ठरवले असून त्याकरीता इच्छुक संस्थांकडून अर्जही मागवले आहेत. या गणनेच्या वेळी कुत्र्यांची केवळ संख्या नाही तर त्यात नर किती, मादी किती, त्यांचे निर्बिजीकरण झाले आहे का, त्यांना रेबीजचे इंजेक्शन दिले आहे का याचीही माहिती संकलित केली जाणार आहे.

हेही वाचा – मुंबई : विमानतळावरील विमानत बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी

‘रेबीजमुक्त मुंबई’साठी महानगरपालिकेने उपक्रम हाती घेतला आहे. आधी सर्वेक्षण करून त्याच्या आधारे फेब्रुवारी २०२४ मध्ये व्यापक स्तरावर रेबीज लसीकरणाची मोहीम प्रस्तावित आहे. या मोहिमेअंतर्गत केवळ १० दिवसांच्या कालावधीत सुमारे एक लाख भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन आहे.

दरवर्षी मुंबईमधील ३२ हजार कुत्र्यांची, तर दर महिन्याला ३६५ कुत्र्यांची नसबंदी करणे आवश्यक आहे. भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या निर्देशानुसार वर्षाला ३० टक्के कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले तरच कुत्र्याची संख्या नियंत्रित राहू शकते. मुंबईतील कुत्र्यांची संख्या पाहता दरवर्षी ३२ हजार कुत्र्यांची नसबंदी करणे आवश्यक आहे. मात्र महानगरपालिकेने सुरू केलेल्या निर्बिजीकरण कार्यक्रमाला यश आले की नाही हे ठरवण्यासाठी ही गणना उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा पुढील कार्यक्रम ठरवता येणार आहे.

२०१४ मधील सर्वेक्षणानुसार मुंबईमध्ये सुमारे ९५ हजार भटके कुत्रे होते. ती संख्या आता सुमारे १ लाख ६४ हजारांवर पोहोचल्याचा अंदाज आहे. निर्बिजीकरण न केलेली एक मादी चार पिल्लांना जन्म देते व ही पिल्ले वर्षभरात प्रजननक्षम होतात. श्वानांचा प्रजनन दर, मृत्यू दर व भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण लक्षात घेऊन ही संख्या ठरवण्यात आली आहे.

हेही वाचा – विश्लेषण : मुंबईच्या किनाऱ्यांवर जेलिफिश आणि स्टिंग रेचा धोका किती?

मालाड, अंधेरीत जास्त भटके श्वान

दरम्यान, २०१४ च्या गणनेत मालाड व अंधेरी, कुर्ला परिसरात सर्वाधिक भटके कुत्रे होते. निर्बिजीकरण न केलेल्या कुत्र्यांचे व मादी कुत्र्यांचे प्रमाणही याच विभागात जास्त आहे. त्यामुळे या परिसरात जास्त भटके कुत्रे असण्याची शक्यता आहे. मात्र कुत्रे आपली हद्द अनेकदा सोडतात व दुसऱ्या हद्दीत जिथे अन्न उपलब्ध होऊ शकते अशा ठिकाणी जातात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Survey of stray dogs in mumbai in january mumbai print news ssb