मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानतर्फे चालविण्यात येत असलेला अंधेरीमधील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलातील जलतरण तलाव मंगळवार, २९ ऑगस्ट २०२३ पासून सभासदांसाठी खुला करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव हा तलाव ८ ऑगस्टपासून बंद ठेवण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महानगरपालिकेने अंधेरी (पश्चिम) येथे १९८८ मध्ये शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल उभारले. या संकुलाचे व्यवस्थापन व परिरक्षण बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक न्यासाकडे सोपविण्यात आले आहे. या क्रीडा संकुलात दोन जलतरण तलाव असून दुरुस्तीच्या कामासाठी सूर मारण्याचा तलाव २६ जुलैपासून, तर शर्यतीचा तलाव ८ ऑगस्टपासून बंद करण्यात आला होता.

हेही वाचा >>>मुंबई: चेंबूरच्‍या शरद नारायण आचार्य उद्यानात बहरणार ‘नागरी वन’; ४८ देशी प्रजातींच्‍या १० हजार २६४ रोपांची लागवड

या दोन्ही तलावांची अभियांत्रिकीय कामे आणि संबंधित चाचण्या करण्यात आल्या असून दोन्ही जलतरण तलाव मंगळवार, २९ ऑगस्टपासून सभासदांसाठी खुले करण्यात येणार आहेत. जेवढ्या कालावधीसाठी जलतरण तलाव बंद होता, तेवढा कालावधी सभासदांना वाढवून देण्यात येणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानने स्पष्ट केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swimming pool at shahjiraje bhosle sports complex in andheri will start from today mumbai print news amy