मुंबई: टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची उपकंपनी आणि भारतातील अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड यांच्यात अक्षयऊर्जा निर्मितीसाठी महत्त्वाचा करार झाला. या माध्यमताून ८० मेगावॅट क्षमतेच्या शाश्वत आणि पुनर्वापर करता येणाऱ्या अक्षय ऊर्जा (एफडीआरई) प्रकल्पासाठी हा करार झाला असून यातून ३१५ दशलक्ष युनिटची विजनिर्मिती केली जाणार आहे. यामुळे मुंबईच्या विजेच्या सर्वाधिक मागणीच्या तासांतील मागणीतही पुरवठा होणारा आहे.

हा प्रकल्प २४ महिन्यांत पूर्ण होईल. यामध्ये दरवर्षी अंदाजे ३१५ दशलक्ष युनिट्स (MUs) वीज निर्मिती होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनामध्ये दरवर्षी ०.२५ दशलक्ष टनांपेक्षा जास्त घट होईल. सर्वात जास्त मागणी काळात ४ तास वीज पुरवठ्याची हमी या उपक्रमाद्वारे देण्यात आली आहे. यामुळे मुंबईतील सर्वात जास्त मागणी असलेल्या काळात किमान ९०% विजेची उपलब्धता सुनिश्चित केली जाणार आहे. हा प्रकल्प टाटा पॉवर मुंबई डिस्ट्रिब्युशनला राज्य नियामक आयोगाने आखून दिलेल्या रिन्यूएबल पर्चेस ऑब्लिगेशन (आरपीओ) पूर्ण करण्यास लक्षणीयरीत्या मदत करेल. यामुळे निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसह आठ लाख ग्राहकांना विश्वासार्ह वीज पुरवठा होईल.