मुंबई : राज्य शासनाने ऑक्टोबर २०२४ मधील अधिवेशनात राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यासंदर्भात निर्णय घेतला. मात्र, अद्यापही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे अंशतः विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक संतप्त झाले आहेत. शासनाच्या उदासीन भूमिकेचा निषेध करण्यासाठी, तसेच राज्यातील विनाअनुदानित शाळांना अनुदानाच्या वाढीव टप्पा मिळावा या मागणीसाठी आझाद मैदानावर शिक्षकांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिक्षक आले आहेत. ८ व ९ जुलै रोजी करण्यात येणाऱ्या आंदोलनामुळे राज्यातील विनाअनुदानित शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.

राज्यातील अंशतः विनाअनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा या मागणीसाठी १ ऑगस्ट २०२४ पासून कोल्हापूर येथे ७५ दिवस, तसेच राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू होती. त्यानंतर शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी १० ऑक्टोबर २०२४ च्या मंत्रिमंडळ निर्णयात या सर्व शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचे कबूल केले होते. राज्यातील जवळपास पाच हजार विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यासंदर्भात १४ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन निर्णयही काढण्यात आला. मात्र, दोन अधिवेशने होऊन गेली, तरी शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सुमारे साठ हजारांहून अधिक शिक्षकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आझाद मैदानावर शासनाविरोधात ज़ोरदार घोषणाबाजी सुरू असून वाढीव अनुदानाची मागणी पूर्ण करण्याची एकमुखी मागणी करण्यात येत आहे. राज्याच्या विविध भागांतून हजारो शिक्षक आझाद मैदानावर दाखल झाले आहेत.

राज्यात जवळपास ५ हजार ८४४ खासगी अंशत: अनुदानित शाळा आहेत. यामध्ये प्राथमिक विभागाच्या ८२० शाळा, माध्यमिक विभागाच्या १ हजार ९८४ शाळा व उच्च माध्यमिक ३ हजार ४० इतक्या शाळा आहेत. या प्राथमिक शाळांमध्ये ३ हजार ५१३, माध्यमिक शाळांमध्ये २ हजार ३८० आणि उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ३ हजार ४३ तुकड्या आहेत. प्राथमिक विभागाच्या शाळांमध्ये ८ हजार ६०२, माध्यमिक शाळांमध्ये २४ हजार २८ आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये १६ हजार ९३२ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. या शाळांना टप्पा अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर २०२४ मध्ये जाहीर करण्यात आला. त्यानुसार शाळांना २० टक्के याप्रमाणे टप्प्याटप्याने अनुदान मिळणार, या आशेवर हजारो शिक्षक आहेत. मात्र, अनेक महिने उलटूनही शिक्षणाच्या पदरी निराशा आली आहे, अशी खंत शिक्षक भानुदास शिंदे यांनी व्यक्त केली.

आझाद मैदानावर सध्या सुमारे २५ हजार शिक्षक उपस्थित असून बुधवारी शिक्षकांची संख्या आणखी वाढेल. अद्याप कोणाकडूनही प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच, सध्या शिक्षकांमध्ये प्रचंड रोष असून शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास हे आंदोलन सुरूच राहील. परिणामी, शाळाही बंद ठेवाव्या लागतील, अशी माहिती शिक्षण समन्वय संघाचे समन्वयक खंडेराव जगदाळे यांनी दिली.