2008 Malegaon Bomb Blast Case Accused Acquitted: मुंबई : एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना आरोपी म्हणून वगळण्यात यावे, अशी शिफारस विशेष न्यायालयाकडे नव्याने आरोपपत्र दाखल करताना केली होती. तथापि, साध्वी यांच्याविरुद्ध खटला चालवता येईल, असे सकृतदर्शनी पुरावे असल्याचे विशेष न्यायालयाने म्हटले होते. तसेच, साध्वीविरुद्ध पुरावे नसल्याचे एनआयएचे म्हणणे आणि शिफारस फेटाळली होती. त्यानंतर न्यायालयाने साध्वी यांच्यावर दहशतवादाच्या आरोपाप्रकरणी आरोप निश्चित केले गेले व त्यांच्यावर खटला चालवण्यात आला.
दरम्यान, विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी गुरूवारी याप्रकरणी निकाल देताना साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची पुराव्याअभावी सुटका केली.
साध्वी यांचा कटात सहभाग असल्याचे दाखविणारा कोणताही साक्षीदार किंवा इतर पुरावा नसल्याचा दावा एनआयएने आरोपपत्रात केला होता. मात्र, साध्वी यांचा स्फोटाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा स्वीकारणे कठीण आहे, अशीही टिप्पणी न्यायालयाने एनआयएचे साध्वी यांच्याबाबतचे म्हणणे अमान्य करताना केली होती.
दुसरीकडे, कर्तव्य आणि त्यांच्या वरिष्ठांच्या परवानगीने स्फोटापूर्वी कथित कट रचण्याच्या बैठकांमध्ये सहभाग घेतल्याचा ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांचा दावाही न्यायालयाने फेटाळून लावला होता. परंतु, २७ डिसेंबर २०१७ रोजी, या प्रकरणात मोक्का लागू करता येणार नाही. हा एनआयएचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला आणि आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर, पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, अजय राहिरकर आणि सुधाकर द्विवेदी या सात आरोपींवर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (युएपीए), भारतीय दंड विधान आणि स्फोटक पदार्थ कायदा, १९०८ अंतर्गत खटला चालविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तर इतर दोन आरोपी, राकेश धावडे आणि जगदीश म्हात्रे यांच्यावर पुण्यात केवळ शस्त्रास्त्र कायदा, १९५९ अंतर्गत खटला चालवला जाईल आणि इतर तिघांना पुराव्याअभावी दोषमुक्त केले होते.