मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत ‘मुंबई १ स्मार्ट कार्ड’ आणि ‘मुंबई १ ॲप’ तयार केले आहे. हे कार्ड आणि ॲप सेवेत दाखल करण्याची प्रतीक्षा मागील काही दिवसांपासून असून आता मात्र ही प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. या कार्ड आणि ॲपचे बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होण्याची शक्यता आहे. तशी तयारी एमएमआरडीएकडून सुरू आहे. हे कार्ड सेवेत दाखल झाल्यास उपनगरीय रेल्वे, बेस्ट, मोनो, मेट्रो आणि एसटीतून एकाच कार्डद्वारे प्रवास करण्याचे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
एमएमआरमध्ये प्रवासासाठी नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय म्हणून उपनगरीय रेल्वे, बेस्ट, एसटी, मोनो, मेट्रोचा वापर करतात. या वाहतूक व्यवस्थांचा वापर करताना प्रवाशांना प्रत्येक प्रवासासाठी वेगवेगळे तिकिट खरेदी करावे लागते. यात प्रवाशांचा वेळ जातो आणि त्यांना त्रासही होतो. ही बाब लक्षात घेऊन वेगवेगळी तिकीटे खरेदी करण्याच्या त्रासातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी ‘मुंबई १ स्मार्ट कार्ड’ तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तर या कार्डची संपूर्ण जबाबदारी एमएमआरडीएवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार एमएमआरडीएने एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत ‘मुंबई १ स्मार्ट कार्ड’ आणि ‘मुंबई १ ॲप’ तयार करण्याचे काम हाती घेतले. ॲप आणि कार्डचे काम पूर्ण झाले असून याआधीच या सेवेचे लोकार्पण होणे अपेक्षित होत. मात्र नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या कार्डचे लोकार्पण करण्यासाठी राज्य सरकार आग्रही असल्याने लोकार्पणाची प्रतीक्षा होती. पण आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
नवी मुंबई विमानतळ आणि कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे मेट्रो ३ मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक – कफ परेड टप्प्याचे बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. वांद्रे – कुर्ला संकुलात होणाऱ्या या कार्यक्रमात ‘मुंबई १ कार्ड’ आणि ‘मुंबई १ ॲप’चे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याविषयी एमएमआरडीएतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी कार्ड आणि ॲप तयार असून या सुविधेचे ८ ऑक्टोबर रोजी लोकार्पण करण्यास हिरवा कंदिल मिळणे शिल्लक असल्याचे सांगितले. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी या सुविधेचे लोकार्पण करण्याच्यादृष्टीने एमएमआरडीए तयारीला लागली आहे. त्यामुळे ८ ऑक्टोबर रोजी हे कार्ड आणि ॲप सेवेत दाखल झाल्यास बेस्ट, रेल्वे, एसटी, मोनो, मेट्रो आणि एमएमआरमधील स्थानिक सार्वजनिक वाहतुकीसाठी एकाच कार्डवरून तिकीट घेता येईल.
तर एकाच ॲपवरूनही तिकीट काढता येणार आहे. त्यामुळे ही बाब प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक ठरणार आहे. दरम्यान, एमएमआरडीएच्या ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘मुंबई १ कार्ड’मध्येच बदल करून ‘मुंबई १ स्मार्ट कार्ड’ तयार करण्यात आले आहे. हे कार्ड ‘मेट्रो २ अ’, ‘मेट्रो ७’, ‘घाटकोपर – वर्सोवा मेट्रो १’, ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे मेट्रो ३’, मोनोरेल, बेस्ट, उपनगरीय रेल्वे, एसटी प्रवासासाठीही चालणार आहे.