मुंबई : मुंबई महानगरपालिका सातत्याने विविध लसीकरण मोहिमा राबवत असून लसीकरणांपैकी महत्त्वाच्या अशा पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला येत्या १८ सप्टेंबर २०२२ पासून सुरुवात होणार असून ही मोहीम २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेदरम्यान पाच वर्षांखालील अंदाजे आठ लाख ९० हजार ४२५ बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी महानगरपालिकेचे पाच हजार गट कार्यरत राहणार असून स्थलांतरित, बेघर बालकांच्या लसीकरणासाठी गट कार्यरत राहणार आहेत. मुंबईकरांनी पाच वर्षांखालील आपल्या बालकांना ही लस द्यावी, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

हेही वाचा <<< आता आईच्या गुन्ह्यातून नवजात बालकांची सुटका; कारागृहामध्ये जन्माला आलेल्या बालकांच्या जन्म दाखल्यावर शहराच्या नावाची नोंद

हेही वाचा <<< प्रताप सरनाईक यांना दिलासा; टॉप्स ग्रुपविरोधातील तपास बंद करण्याचा अहवाल न्यायालयाने स्वीकारला

या मोहिमेसाठी एकूण चार हजार ८२१ बूथ कार्यरत राहणार आहेत. तसेच या दिवशी ३२२ ट्रान्झिट गट विविध रेल्वे स्थानके, उद्याने, पर्यटनस्थळे या ठिकाणी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत कार्यरत राहणार असून विविध बांधकाम स्थळांवरील स्थलांतरित बालकांचे लसीकरण करण्यासाठी ४३ गट दिवसा कार्यरत असणार आहेत. तर मोहिमेदरम्यान बालकांना डोस पाजायचा राहून गेला असेल, त्यांना घरोघरी भेटी देऊन प्रत्येकी २ स्वयंसेवकांच्या लसीकरण गटातर्फे पोलिओ डोस पाजण्यात येतील.